बच्चू कडू-रवी राणांच्या वादात भाजप पडणार नाही, पण रस्त्यावर भाडणं करु नका; भाजप प्रदेशाध्यक्षांचा सल्ला
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघेही शिंदे सरकारमध्ये असल्याने त्यांनी किमान राज्य सरकारच्या हितासाठी रस्त्यावर तरी भांडू नये,असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.
Chandrashekhar Bawankule News: अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana)विरुद्ध बच्चू कडू यांच्यात सुरु असलेल्या वादात भाजप पडणार नाही. मात्र दोघेही शिंदे सरकारमध्ये असल्याने त्यांनी किमान राज्य सरकारच्या हितासाठी रस्त्यावर तरी भांडू नये, असा सल्ला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. तर सुषमा अंधारेंनी आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करावी असा टोला बावनकुळे यांनी लगावला. बावनकुळे हे तीन दिवसाचा ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात त्यांनी शुक्रवारी भिवंडीतून केली.
सध्या राज्याच्या राजकीय अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार राणा आणि बच्चू कडू गाजत आहे. दोघेही समजदार आणि वजनदार नेते आहेत. सध्या दोघांमध्ये जो वाद सुरु आहे. त्या वादात भाजपा पडणार नाही. मात्र दोघेही शिंदे सरकारमध्ये असल्याने त्यांनी किमान राज्य सरकारच्या हितासाठी तरी रस्त्यावर तरी भांडू नये, असा सल्ला दोघांना देत, या दोघांना वेगळं करण्यासाठी तिसरा कुणी तरी व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा संशय चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सुषमा अंधारेंनी आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करावी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे टीका करताना दिसत आहेत. याबाबत बावनकुळेंना विचारलं असता ते म्हणाले की, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेलं काम महाराष्ट्रसाठीचं व्हिजन तसेच विविध काम करण्याची त्यांची खास शैली आहे. गेल्या 35 वर्षापासून राजकीय आयुष्य राज्यासाठी दिले आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी आपली उंची काय? दुसऱ्याची उंची काय? हे पाहून विचार करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करावी, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या विषयासंदर्भात बोलताना बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, जर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आयडेंटिटी मागितली तर कोणीही असो त्यांनी आयडेंटिटी दिली पाहिजे या विचाराचा मी आहे. जे मंत्रालयाच्या गेटवर घडलं त्याची माहिती मला नाही, असं त्यांनी म्हटलं.
बावनकुळे आजपासून 3 दिवस ठाणे जिल्ह्याचा दौऱ्यावर
चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून 3 दिवस ठाणे जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांचा ठाणे जिल्हा दौरा संघटनात्मक बांधणी आणि भेटीगाठी यासाठी आहे. भिवंडी शहरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. 3 दिवसीय दौऱ्यात भाजपा कार्यकर्ता बाईक रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सामाजिक माध्यम बैठक, कार्यक्रमाअंतर्गत दोन लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत.