Central Railway : मध्य रेल्वेची 'फ्लड रिलीफ टीम' सज्ज, सध्या पाच स्थानकांवर तैनात
Central Railway : संकटकाळात प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी मध्य रेल्वेची 'फ्लड रिलीफ टीम' सज्ज झाली असून सध्या केवळ पाच रेल्वे स्थानकांवर ही टीम तैनात असणार आहे. या पथकाने काल (मंगळवारी) ठाण्याच्या मासुंदा तलावात नागरिकांना वाचवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
ठाणे : वारंवार रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी भरल्यानंतर प्रवासी हे लोकलमध्ये अडकतात. त्यावेळी लोकलमधून बाहेर पडणे देखील धोक्याचे असते. कारण सर्वत्र रुळांवर पाणी साचलेले असते. अशावेळी रेल्वे प्रशासनाला स्थानिक अग्निशमन दलाची किंवा एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागते. मात्र आता ही पथके येण्याच्या आधीच मध्य रेल्वेचे स्वतःचे आरपीएफ पथक या प्रवाशांना रेस्क्यू करणार आहे. या पथकाने काल (मंगळवारी) ठाण्याच्या मासुंदा तलावात नागरिकांना वाचवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महासंचालक आलोक कंसल, आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या आरपीएफने सर्वात पहिली "रेल्वे फ्लड रिलीफ टीम" तयार केली असून या टीममध्ये पंधरा जवानांचा समावेश केला आहे. त्यापैकी 10 पुरुष आणि पाच महिला आहेत. या टीमकडे रेस्क्यू करण्यासाठी बोटी देण्यात आलेल्या आहेत. सध्या पाच स्थानकांवर या बोटी आणि ही टीम तैनात आहे. या टीमला एनडीआरएफ पथकाने पुण्यात प्रशिक्षण दिले आहे. संकटकाळात प्रवाशांचे जीव कसे वाचवावे याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.
याच टीमचे सराव शिबिर आज ठाण्याच्या मासुंदा तलावात घेण्यात आले. त्यांच्यासमोर मध्य रेल्वेने पावसाळ्यासाठी केलेल्या तयारीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हे पथक नागरी प्रशासन, जीआरपी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नियंत्रण कक्षामधील अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून काम करेल. या पथकाचा विस्तार करण्यासाठी इतर जवानांचे ट्रेनिंग देखील सध्या सुरु आहे. या व्यतिरिक्त, आरपीएफने रेल्वे पूर मदत दलासाठी एक विस्तृत तपशीलवार एसओपी तयार केली आहे.
ही टीम कशी काम करेल?
निळा इशारा (ब्ल्यू अलर्ट) : जेव्हा पाण्याची पातळी रेल्वे पातळीपासून चार इंचाच्या वर पोहोचेल, तेव्हा हे पथक अलर्ट होईल आणि तयारी सुरू करेल.
नारंगी इशारा(ऑरेंज अलर्ट) : जेव्हा पाण्याची पातळी रेल्वे पातळीपासून पाच इंचाच्या वर पोहोचेल, तेव्हा हे पथक त्या घटनास्थळी जाईल.
लाल इशारा (रेड अलर्ट) : जेव्हा कोणत्याही स्थानकावर पाणी भरल्याने ट्रेन थांबवली जाईल, तेव्हा त्या ठिकाणी पाण्याची पातळी तीन फूट आहे याची खात्री करुन मदतकार्य सुरु करण्यात येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :