नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात गुन्हा दाखल
दिल्ली येथून आलेल्या 10 पैकी 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोनाची बाधा झालेली असताना देखील त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता वाशीमध्ये वास्तव्य केले होते.
नवी मुंबई : दिल्ली येथून वाशी सेक्टर 9 येथील नूर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपिन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरानाचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी या 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथून आलेल्या 10 पैकी 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोनाची बाधा झालेली असताना देखील त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता वाशीमध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या मशिदीतील मौलवीसह काही कर्मचारी व नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
दरम्यान, कोरोनासंदर्भात गुन्हा दाखल होण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे. मार्च महिन्यात दिल्ली येथील निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात फिलिपिन्स देशातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली येथील कार्यक्रम संपल्यानंतर 10 मार्च रोजी तबलिगी जमातीचे 10 फिलिपिन्स नागरिक वाशी सेक्टर-9 येथील नुरुल इस्लाम ट्रस्टच्या नुर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सर्व फिलिपिन्स नागरिक हे 16 मार्चपर्यंत नवी मुंबईत वास्तव्यास होते. त्यातील 68 वर्षीय व्यक्तीसह तिघांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असताना देखील स्थानिक प्रशासन अथवा पोलिसांना याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. याउलट ते नवी मुंबईत वास्तव्यास राहिले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या वाशीतील मस्जिदच्या मौलवींसह इतर अनेकांना कोरोनाची लागण झाली. अशा पद्धतीने फिलिपिन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आणि नवी मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे आढळून आलं आहे. ज्या 3 फिलिपिन्स नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इतर सात फिलिपिन्स नागरिक हे पुन्हा दिल्ली येथे परतले आहेत. या फिलिपिन्स नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची माहिती न देता वास्तव्य करुन त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना या रोगाचा संसर्ग पसरवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष कांबळे यांनी या प्रकरणातील 10 फिलिपिन्स नागरिकांविरोधात फिर्याद दाखल करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबधित बातम्या