एक्स्प्लोर
डोंबिवलीत इमारत खचली, 23 कुटुंब रस्त्यावर
डोंबिवलीः डोंबिवलीमध्ये देवी चौकातील द्रौपदी निवास इमारत खचल्यामुळे महापालिका प्रशासनाने इमारत तात्काळ खाली करण्याचं फर्मान काढलं आहे. अचानक दिलेल्या या आदेशामुळे इमारतीतील 23 कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
शिवाय या इमारतीत न्यू इंग्लिश मॉडर्न स्कूल नावाची शाळा देखील आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
द्रौपदी इमारतीत 1984 सालापासून 23 कुटुंब राहतात. या इमारतीत न्यू इंग्लिश मॉडर्न स्कूल ही इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून या इमारतीची भिंत खचल्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गुरूवारी दुपारी इमारतीत राहणाऱ्या 23 कुटुंबांना आपापली घरे तात्काळ खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
रहिवाशांना पालिका सभागृहात आश्रय
इमारत तात्काळ खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे 23 कुटुंब रस्त्यावर आली आहेत. मंगळवारी या इमारतीच्या मागच्या भिंती खचल्या होत्या. त्यानंतर इमारत खचत चालली असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं इमारत खाली करण्यासाठी पालिकेने हालचाल केली आहे. पालिकेचे ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे अधिकारी परशुराम कुमावत यांनी इमारतीमधील रहिवाशांना पालिकेच्या संक्रमण शिबिर, रात्र निवारा केंद्र आणि सभागृहात काही दिवस आश्रय देण्याचं मान्य केलं आहे, असं इमारतीचे मालक अभिमन्यू जोशी यांनी सांगितलं.
रहिवाशांचा इमारत मालकाविरोधात संताप
दरम्यान इमारतीतील रहिवाशांनी इमारत मालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मालकाने वारंवार इमारत दुरुस्तीसाठी पैसे उकळले. मात्र इमारतीचे कसलेही काम झाले नाही. तसेच कसलीही पूर्व सूचना दिली नाही. काही दिवस पालिकेच्या सभागृहात निघतील मात्र त्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचे का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे.
महापालिकेने रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन दिली असली तरी पावसाळा तोंडावर आला असताना सर्व कुटुंबांचं व्यवस्थापन संक्रमण शिबीर आणि सभागृहामध्ये होणं शक्य नाही, असं नागरीकांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement