मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवांमुळं खळबळ
Bomb Threat : मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवामुळे खळबळ उडाली होती. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या या निनावी फोन कॉलची माहिती त्यांना तत्काळ मुंबई पोलिसांना दिली.
मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. दोन तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं, सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. या निनावी फोननंतर भायखळा, दादर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. शुक्रवारी रात्री 9 : 45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल करणाऱ्या इसमाचा शोध सुरु आहे.
शुक्रवारी रात्री 9 : 45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा रेल्वे स्थानकं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणी दाखल झालं. बराच वेळ शोधाशोध करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. पोलिसांनी ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरवर फोन केला. त्यावेळी, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडे जी माहिती होती, ती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करुन नका, असं सांगितलं आणि फोन स्विच ऑफ केला. त्याचा फोन बंद असल्यामुळं पोलिसांना त्याचा शोध घेणं काहीसं कठिण होत आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली होती. धमकीचा मेल आल्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. शैलेश शिंदे असं अटक केलेल्या इसमाचे नाव असून त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली होती. शैलेश शिंदेचं वय 45-50 च्या दरम्यान आहे.
त्यांनी आपल्या मुलाचे पुण्यातील वानवडी येथील हाचिंग्स शाळेने एका वर्षाचे नुकसान केले म्हणून तीन वर्षांपूर्वी उपोषण केले होते. याशिवाय शिक्षण विभागाकडे याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही लक्ष न दिल्याने शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात धमकी वजा इशारा देणारा ईमेल पाठविला होता. याबाबत मुंबई मंत्रालयातून माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती मिळाली होती.