ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज, बीएमसीची हायकोर्टात ग्वाही
नागरी आरोग्याबाबत कोणतीही कसर ठेवली जाणार नाही आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची ठोस अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा हायकोर्टानं व्यक्त केली आहे.

मुंबई: ओमायक्रॉनला सामोरं जाण्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज आहे. रूग्णवाहिका, रुग्णालयातील बेडची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच आतापर्यंत झालेल्या लसींची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सोमवारी पालिकेच्या वतीनं हायकोर्टात सादर केल गेलं. देशासह राज्यात सध्या कोरोनाचा 'ओमायक्रॉन' हा विषाणु धोक्याची घंटा ठरतोय, मुंबईच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या विषाणुपासून मुंबईतील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही कसर ठेवणार नाही, आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची ठोस अंमलबजावणी होईल. अशी अपेक्षा व्यक्त करत यावर पुढील सोमवारी सुनावणी घेण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं निश्चित केलं आहे.
मुंबई महापालिकेची ओमायक्रॉनसाठीची सज्जता
कोरोनाचा देशभरातील वाढता प्रादुर्भाव आणि त्या संदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
पालिकेच्या दाव्यानुसार मागील आठवड्यापासून, ओमायक्रॉनसह कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असली तरीही रुग्णालयातील किंवा अतिदक्षता विभागातील या रुग्णसंख्या कमी आहे. शहरात कोविड-19 चे 1,17,437 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 7473 रूग्णालयात सामान्य वॉर्डाच आहेत तर 814 रूग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
या रूग्णांपैकी केवळ 3 टक्के रूग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता होती. तर दुसरीकडे, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1 कोटी 31 लाख 137 लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 82 लाख 76 हजार199 लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. तर 15 ते 18 वयोगटातील 6 लाख 12 हजार 461 मुलांचे लसीकरण होणार असून त्यापैकी 65 हजार 289 मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्याची दखल घेत ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे मुंबईतील सर्वसामान्यांच्या आरोग्याशी पालिका प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही, याबाबत आम्हाला विश्वास आहे. असं यावेळी नमूद करत हायकोर्टानं या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याचं निश्चित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :























