Coronavirus : मुंबईतील कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी महापालिकेची कठोर कार्यपद्धती : महापौर
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच अनेकजण बेड अडवून ठेवत असल्याचंही महापालिकेच्या पाहणीतून समोर आलं असून, आता सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून कठोर कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे.
मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच मुंबईतही कोराना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणं कठिण झालं आहे. तर अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये बेड अडवून ठेवत असल्याचंही निदर्शनास आल्यामुळे आता महापालिकेनं अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीनं बेड वाटप करण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलताना सांगितलं की, "मुंबईतील कोविड रुग्णांना योग्य बेड मिळण्यासाठी महापालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत. कठोर कार्य पद्धती अमलात आणली जाणार आहे. प्रत्येक वार्डसाठी दोन नोडल अधिकारी असतील. हे अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते 7 या वेळेत काम पाहणार आहेत. त्यामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांना बेडसाठी जी वणवण करावी लागते, ती करावी लागणार नाही. योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळतं नाही. त्यावेळी नागरिक 1916 वर कॉल करतात. मात्र, अनेकांना फोन व्यस्त लागतो, अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. मुंबईकरांनी प्रत्येक वॉर्डमधील वॉररुममध्येच फोन करावा. जेणेकरून वॉररुम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील."
"24 तासांच्या आत रिपोर्ट देण्याचे महापालिकेनं प्रयोगशाळांना सांगितलं आहे. जेणेकरून लगेच त्यांच्यावर औषधोपचार करता येतील. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचं, याचीही वर्गवारी करण्यास मदत होईल. महापालिकेनं हॉटेल्सची मदत घेतली आहे. त्या हॉटेल्समध्ये कोविड सेंटरसारखेच प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील. अशा हॉटेल रुममध्ये बरं झाले आहेत, तरीही खासगी बेड अडवून ठेवलेले आहेत. त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे. ज्यांना ज्या हॉटेलमध्ये राहणं परवडेल, त्यांनी तिथं राहावं अशी व्यवस्थाही केलेली आहे. बेड अडवून ठेवल्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.", असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर पुढे बोलताना म्हणाल्या की, "महापालिकेने मुंबईतील रूग्णालयात 325 अतिरिक्त आयसीयू बेड जोडले आहेत. त्यामुळे आताची आयसीयु बेडची संख्या 2466 वर गेली आहे, तर 19151 बेड वाटप डॅशबोर्डवरील कोविड बेड झाले आहेत. तिथे इतर 141 रुग्णालये आहेत त्यातील 3777 बेड रिक्त आहेत. पालिका येत्या 7 दिवसांत 1100 अतिरिक्त कोविड केअर सेंटर 125 आयसीयूसह कार्यान्वित करेल. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोवीड सेंटर उभी राहणार असून याद्वारे 2 हजार बेड उपलब्ध होतील. यातील 70 टक्के बेड ऑक्सीजनचे असतील आणि 200 बेड आयसीयूचे असतील." तसेच त्यांनी यावेळी बोलताना मुंबईकरांनी स्वतःला जपण्यासोबतच काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी राज्यात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान
- मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच