BMC: मुंबईच्या झगमगटामुळे महापालिकेच्या वीजबिलात 12 ते 15 टक्के वाढ, बीएमसीला भुर्दंड आणि जनतेच्या पैशाच्या अपव्यय
Mumbai G20 Summit: G20 च्या निमित्ताने मुंबईला सजवण्यात येत असलं तरी त्याचा भुर्दंड मात्र सामान्य मुंबईकरांना बसत असल्याचं दिसून येतंय.
मुंबई: शहरात G20 निमित्ताने आणि सुशोभीकरणाकरिता ठिकठिकाणी लाईट्स लावण्यात आले आहेत, रोषणाई करण्यात आली आहे. मात्र आता या लाईट्सच्या बिलाचा भार मात्र मुंबई महापालिकेला सहन करावा लागतोय. कारण या लाईट्समुळे प्रत्येक मुंबई महापालिकेच्या वार्डच्या वीज बिलात 12 ते 15 टक्क्यांची वाढ दिसत आहे. शिवाय अनेक ठिकाणी हे लाईट तुटायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे एकीकडे बीएमसीला वीज बिलाचा भुर्दंड आणि दुसरीकडे जनतेच्या पैशाचा अपव्यय या दोन्ही गोष्टींमुळे त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
एकीकडे जी 20 परिषदेसाठी सजवली गेलेली मुंबई तर दुसरीकडे मुंबईत सुशोभीकरणकरिता केलेला झगमगाट. ही लाइटिंग जरी मुंबईला एका उंचीवर घेऊन जात असली आणि मुंबईचे रूपड पालटणारी दिसत असली तरी या लाइटिंगचा वीज बिलाचा भार मात्र मुंबई महापालिकेला सोसावा लागत आहे. कारण याच लाइटिंगमुळे मुंबईतील वॉर्डवाईज वीज बिलांमध्ये 12 ते 15 टक्क्यांनी वाढ होत असल्याचं समोर येतंय.
आता मुंबईच्या लाइटिंगमुळे कशाप्रकारे वीज बिलात वाढ झालीये? ही आपण एका वार्डच्या मागील काही महिन्याच्या विज बिलावरून अंदाज घेऊया
रस्त्यावरील आणि गार्डन मधील लाइटिंग चे बिल
ऑक्टोबर 2022 - 73,78,358
नोव्हेंबर 2022- 74,16,621
ज्या महिन्यापासून लायटिंग मुंबईत सुरू करण्यात आली
डिसेंबर 2022-75,43,644
जानेवारी 2023- 1,51,88,446
फेब्रुवारी - 2023- 74,97,750
ही वाढ 12 ते 15 टक्के दिसत असती तरी त्यामुळे प्रदूषण आणि वाहन चालवताना चालकांना प्रकाशामुळे होणारा त्रास हा वेगळाच. आता मुंबईत सर्वत्र दिसणारी ही लाइटिंग पावसाळ्यातसुद्धा सुरू राहणार का ? कारण हे लाईट आताच अनेक ठिकाणी तुटायला लागले आहेत, बंद व्हायला लागले आहेत. त्यामुळे लाइटिंगसाठीचा हा खर्च काही दिवसांपुरताच झगमगाट करण्यासाठी होता का? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने पडतोय
त्यामुळे येणारा पावसाळा बघता हा मुंबईचा झगमगाट आणखी किती दिवस पाहायला मिळणार? हे जरी सध्या माहित नसलं तरी या झगमगटामुळे मुंबई महापालिकेची तिजोरी तर खाली होणारच शिवाय लाइटिंगसाठी केलेला सर्वसामान्यांचा खर्च सुद्धा पाण्यात जाणार असल्याचं दिसतंय.