डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी BMC यंत्रणा सज्ज; मोफत चाचणी, फीव्हर ओपीडी, विभागीय वॉर रूमची तयारी
पावसाळाजन्य आजारांसाठी मुंबईतील प्रमुख रूग्णालयांमध्ये 3 हजार रूग्णशय्यांची राखीव व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यांनी समन्वय यंत्रणांची बैठक घेतली.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या सक्रीय सहभागाने उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळी आजारांच्या वेळीच प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात रूग्णांचा त्वरित शोध घेऊन तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य द्यावे. यंदा संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी आजारांसाठी राखीव अशा 3 हजार रूग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तापसदृश आजारांसाठी 'फिव्हर ओपीडी'ची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले.
विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक 3 जुलै 2024) पार पडली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. नीलम अंद्राडे, कीटकनाशक अधिकारी श्री. चेतन चौबळ, प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी आणखी एका बैठकीमध्ये विभागातील सहाय्यक आयुक्तांनाही पावसाळाजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. समाजासाठी अतिशय घातक अशा डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी विविध यंत्रणांच्या सहाय्याने सामूहिक पद्धतीने योगदान गरजेचे आहे. पावसाळ्यातील आगामी तीन महिने हे आव्हानात्मक असणार आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने शोधून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या पद्धतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. अविरतपणे एकत्र सहभागातून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान देण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी यानिमित्ताने केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय पातळीवर अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. महानगरपालिका आणि खासगी प्रयोगशाळेच्या ठिकाणी नियमितपणे रूग्णसंख्या अद्ययावत करण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या २० हून ८०० इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे मानव – डास साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक रूग्णसंख्या नोंदवली जाणे गरजेचे आहे. म्हणूनच वेळीच सर्वेक्षण, रूग्ण शोधणे, विलगीकरण आणि उपचार हे सूत्र वापरण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले.
प्रमुख रूग्णालयांमध्ये तीन हजार रूग्णशय्यांची व्यवस्था
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रमुख चार रूग्णालयांमध्ये पावसाळी आजारांच्या उपचारासाठी एकूण 3 हजार रूग्णशय्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम) 30 रूग्णशय्या , लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय 162 रूग्णशय्या, बा.य.ल. नायर रूग्णालय 411 रूग्णशय्या, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे डॉ. रू.न. कूपर रूग्णालय 107 रूग्णशय्या तसेच उपनगरीय सर्वसाधारण रूग्णालयात 961 रूग्णशय्या याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.
पावसाळाजन्य आजारांचा अभ्यास केलेले अनुभवी डॉक्टर करणार मार्गदर्शन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमधील कम्युनिटी मेडिसिनमधील चार तज्ञ डॉक्टरांचा चमू प्रत्येक विभागामध्ये पावसाळी आजारांच्या उपाययोजनांसाठी मदतीला असणार आहे. या तज्ञ डॉक्टरांचा अनुभव तसेच वैज्ञानिक पद्धतीने रूग्ण हाताळण्याची उपचार पद्धती विभागांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये असणाऱ्या उणीवा भरून काढणे तसेच रूग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने उपचार पद्धतीसाठीचे मार्गदर्शन या डॉक्टरांमार्फत अपेक्षित आहे.
मुंबईत डेंगी आणि हिवताप (मलेरिया) रूग्णांची अधिक संख्या असलेल्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित (फोकाय) पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डेंगी आणि हिवतापाच्या अधिक रूग्णसंख्येच्या ठिकाणी अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भर आहे. या विभागांच्या ठिकाणी वेळीच सर्वेक्षण मोहीम राबवत रूग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आपला दवाखान्यामध्ये डेंगी, हिवतापाच्या मोफत चाचण्या उपलब्ध
तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या रूग्णालयात चाचणी करून घ्यावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याठिकाणी डेंगी आणि हिवतापाच्या मोफत चाचण्या उपलब्ध आहेत. तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास किंवा परिसरात डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्यास तत्काळ आपल्या नजीकच्या विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर वॉर रूम तसेच शीघ्र प्रतिसाद चमुची नेमणूकही करण्यात आली आहे. तसेच पुरेशा प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रमुख रूग्णालयात 'फीव्हर ओपीडी' ची सुविधा
तापसदृश्य उपचारांसाठी महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमध्ये 24 तास बाह्यरूग्णसेेवा उपलब्ध आहे. राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय दुपारी 4 ते रात्री 10, डॉ. रू.न. कूपर दुपारी 2 ते रात्री 8, लोकमान्य टिळक सर्वसाधारण (शीव) रूग्णालय 24 तास, बा.य.ल नायर रूग्णालय दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत तर, उपनगरीय रूग्णालयात सायंकाळच्या वेळेत बाह्य रूग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.