BMC On Mumbai Potholes: मुंबई महापालिकेने साडे तीन महिन्यात बुजवले 6000 खड्डे; नागरिकांना 'इथं' करता येईल तक्रार
Mumbai Potholes : मुंबई महापालिकेने मागील जवळपास चार महिन्यात सुमारे सहा हजार खड्डे बुजवले असल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
Mumbai Potholes : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील पूर्व व पश्चिम असे दोन्ही द्रुतगती महामार्ग आणि इतरही सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात आल्या आहेत. रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षात 1 एप्रिल ते 24 जुलै 2023 या कालावधीत महानगरपालिकेने विविध रस्त्यांवर मिळून सुमारे 6 हजार 45 खड्डे बुजवले असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 11 हजार 38 चौरस मीटर इतके असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभागात तातडीने खड्डे भरण्यासाठीच्या उपाययोजना अतिशय चोखपणे पार पाडण्यात येत आहेत.
मुंबईतील द्रुतगती महामार्गासह सर्व रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ते तातडीने भरण्यासाठी संपूर्ण मुंबईत यंत्रणा कार्यरत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेणारा पाहणी दौरा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू यांनी काल (रविवार, दिनांक 23 जुलै 2023) केला. मुंबई महानगरात रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी झालेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच आवश्यक त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशदेखील दिले आहेत.
पश्चिम उपनगरात दक्षिण दिशेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हे अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्याच्या निमित्ताने यंदा झालेल्या कामांपैकी हे एक उत्तमरितीने झालेले असे काम आहे. काही ठिकाणी रस्ता दुभाजकांच्या ठिकाणी पाणी निचरा होण्याचा विषय असला तरीही रस्त्यांवरील खड्डे मात्र उत्तमरित्या बुजविण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाळापूर्व रस्ता दुरूस्तीचे झालेले काम कौतुकास्पद आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी गोदरेज परिसरात काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे तातडीने पूर्ण करण्यात यावे, त्याचप्रमाणे पूर्व उन्नत द्रुतगती महामार्गावरही काही ठिकाणी आढळलेले खड्डे वाहतुकीला अडथळा न होता लवकरात लवकर भरावेत, अशी सूचनाही या दौऱ्यात वेलरासू यांनी रस्ते विभागाला केली.
मुंबई महानगरात सुमारे 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी एक हजार 58 किलोमीटर डांबरी तर 992 किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नेहमीची बाब आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात.
मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे शोधून ते भरण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार केले आहेत. या पथकाद्वारे खड्डे शोधून ते भरण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते. खड्डे विषयक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी 48 तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे 24 तासाच्या आतमध्ये खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ही पथकं समन्वय साधतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे काम महानगरपालिका करत असते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो. आतापर्यंत 24 प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे 512 मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहे.
रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी देखील महानगरपालिकेने नेमलेली पथके लक्ष ठेवून आहेत.
रस्त्यावर खड्डे पडल्यास इथं करा तक्रार:
रस्त्यांवरील खड्ड्यांविषयक तक्रार नोंदविण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत.
मुंबई महापालिकेचे ऑनलाइन पोर्टल/अॅप MyBMCpotholefixit ॲपवर तक्रार दाखल करता येऊ शकते. त्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 1916 वर संपर्क साधता येईल. सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात (CFC) लेखी तक्रार दाखल करता येईल. मुंबई महापालिकेचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1800221293 वर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रार दाखल करता येईल. मुंबई महापालिकेचे @mybmcroads हे ट्विटर हॅण्डल आणि बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999 वर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी करू शकता.