भाजपचे मिशन BMC, आशिष शेलारांच्या जागी नवीन चेहरा? मुंबई अध्यक्षपदी फडणवीसांचे निकटवर्तीय सुनील राणेंची निवड शक्य
Mumbai BJP President : मुंबई अध्यक्षपदासाठी माजी आमदार सुनील राणे यांच्या नावाची चर्चा असून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे. राणे हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
मुंबई : राज्यातील विधानसभा मोठ्या बहुमताने जिंकल्यानंतर आता ठाकरे गटाचे शक्तिस्थळ असलेली मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत हाती घ्यायचा चंग बांधल्याचं दिसतंय. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्या जागी नवीन चेहरा देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार सुनील राणे यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना आता मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजप आणि महायुतीला सध्याची स्थिती अनुकूल असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आता मुंबई कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मुंबई अध्यक्षपदी सध्या आमदार आशिष शेलार असून त्यांच्या ठिकाणी आता नवीन चेहरा देण्यात येईल अशी माहिती आहे. त्याच दृष्टीने माजी आमदार सुनील राणे यांच्या नावाची चर्चा आहे.
सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक असून या आधी 2017 साली निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवेसेनेने 84 जागा मिळवत सर्वात महापालिका ताब्यात घेतली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेना एकत्रित होते. आता शिवसेनेचे दोन गट झाले असून ठाकरे गटानेही त्यांचा शेवटचा गड हाती ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
गेल्या वेळची निवडणूक भाजपने आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या. यंदा मात्र त्यामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याला कोणतीही जबाबदारी दिली तर आपण ती पार पाडू. जर जबाबदारीतून मुक्त केलं तरीही आपण पक्षासाठी अधिक प्रभावीपणे काम करू असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.
माजी आमदार सुनील राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचं समजलं जातं. यंदाच्या विधानसभेसाठी त्यांनी पक्षाकडून तिकीट मागितलं होतं. पण त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळे आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. आपल्याला मुंबईची जबाबदारी दिली तर ती आपण आनंदाने पार पाडू अशी प्रतिक्रिया सुनील राणे यांनी दिली आहे.
महायुती 185 जागा जिंकणार, शेलारांचा दावा
यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि महायुती मिळून 185 जागा जिंकणार असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेसोबत लढून 82 जागा जिंकल्या होत्या. आता महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन मुंबई महापालिकेमध्ये 185 जागा जिंकणार असल्याचा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: