Kalyan Dombivli : नालेसफाईत सत्ताधाऱ्यांचे कंत्राटदार असल्याने भ्रष्टाचार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप
भाजप आमदार गणपत गायकवाड (mla ganpat gaikwad) यांनी कल्याण डोंबिवलीमधील (Kalyan-Dombivli) मुख्य नालेसफाईच्या कामात कंत्राटदार आणि सत्ताधारी लोकं काम करत असल्याने अधिकाऱ्यांना दबावाखाली राहावं लागत असल्याचा आरोप केला आहे.
कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीमधील (Kalyan-Dombivli) नालेसफाई कामावरून भाजप आमदार गणपत गायकवाड (mla ganpat gaikwad) यांनी चांगलाच हल्ला चढवला. मुख्य नाले सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, सत्ताधाऱ्यांचे कंत्राटदार आणि त्याच पक्षांची लोकं काम करत असल्याने अधिकाऱ्यांना दबावाखाली राहावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. नालेसफाईच्या कामावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार गायकवाड यांनी आज कल्याण पूर्व परिसरात महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांवर आगपाखड करत पुढील दोन ते तीन दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण करा अशी तंबी देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना दिली. या पाहणी दरम्यान पालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. पाहणी दरम्यान तुंबलेली गटारे व नाल्यामधील कचरा पाहून आमदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून (Kalyan-Dombivli) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे सुरू आहेत. नालेसफाईची कामे 50 ते 55 टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. आठवडाभरापूर्वी पाहणी केली होती तेव्हा सांगितलेली कामे आजतागायत का पूर्ण केली नाहीत ? असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना केला.
पत्रकारांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. नालेसफाई मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू करायला पाहिजे होती. मात्र, उशिराने सुरू केली. यंदा हवामान खात्याने पाऊस लवकर पडणार सांगितलं असतानाही नालेसफाई पूर्ण झालेली नसल्याचे आमदार गणपत गायकवाड म्हणाले.
हे ही वाचलं का ?