पोलीसांना मोफत घरे द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, भाजप आमदार कालीदास कोळंबकरांचा एल्गार
पोलीसांना मोफत घरे मिळण्यासाठी भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पोलीसांना मोफत घरे द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
मुंबई : बीडीडी चाळीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना ५० लाखात घर देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर वादंग निर्माण झाले आहे. ही रक्कम अधिक असल्याची भावना पोलीसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीसांना मोफत घरे मिळण्यासाठी भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पोलीसांना मोफत घरे द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
कोळंबकर म्हणाले की, गृहनिर्माण मंत्र्यांनी पोलीसांना मुख्यमंत्री बीडीडी चाळीत पन्नास लाख रुपयात घरे दिली जातील, अशी घोषणा केली आहे. मात्र, ते परवडण्यासारखे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मोफत घर देऊ असं सांगितलं होतं. कोरोना काळात घरच्यांचा विचार न करता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चांगली ठेवल्याने सरकार त्यांना गिफ्ट देतील असं वाटतं होतं. मात्र तसं झालं नाही. 50 लाखांमध्ये घर देण्याची घोषणा केली, त्यामुळे मी उपोषणाला बसलो आहे. आता माहिती मिळत आहे की, या घराची किंमत 20 लाखापर्यंत केली जाणार आहे, पण घर मोफत द्या ही आमची मागणी आहे, तुमच्याने काही काम होत नसतील तर खुर्च्या खाली करा, असे आव्हान दिले.
- सरकारी क्वॉर्टर्स मालकीने देण्याची प्रथा सुरु झाली तर महाराष्ट्र अडचणीत सापडेल : जितेंद्र आव्हाड
त्यांना कोणाचा तरी फायदा करायचा आहे, फडणवीसांची टीका
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीसांना मोफत हक्काचं घर मिळावं, यासाठी कोळंबकर उपोषणाला बसले आहेत. मोर्चा काढला होता. मी मुख्यमंत्री असताना कालिदास यायचे आणि हे प्रश्न मांडायचे
मी अभ्यास केला आणि घर देण्याचे सांगितले होते. मात्र, आता हे सरकार कोणाच्या फायद्यासाठी बिल्डर नेमून विकास करू पाहत आहे ? त्यांना कोणाचा तरी फायदा करायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. मी मुख्यमंत्री असताना बैठकी घेत होतो, म्हाडाचा माध्यमातून विकास करण्याचं ठरलं होतं. या विकासाबद्दल कोर्टात देखील प्रकरण गेल होत , त्यावेळी आम्ही कोर्टात देखील मोफत घरं देण्याच्या सांगितलं होतं, असे फडणवीस म्हणाले.
पोलीस कर्मचारी रझा अकादमी वाले नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, मला बीडीडी चाळकरांना मोफत घरे द्यायची आहेत. कालिदास कोळंबकर हे मुघली विचारांचे नाहीत. त्यांची सरकार दखल घेत नसेल तर या सरकारचा धिक्कार आहे. मी पोलीसांच्या घराची केस मोफत लढायला तयार आहे, घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे.
लोकांचा विश्वास सरकारवर नाही ,विरोधी पक्षावर आहे. आम्ही तुमच्या मागे आलोय , घराचा विषय लवकरच सुटेल असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.