ठाणे महापालिकेच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढण्याची भाजपची मागणी, मनपा आयुक्त आणि महापौरांना पत्र
ठाणे महापालिकेवर सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. त्यात महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून विविध अनावश्यक मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेवर 3 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा असल्याने आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका तयार करा. त्याचबरोबर ठाणेकरांच्या माथी मारलेले `सुटा बुटातील' अनावश्यक प्रकल्प थांबवून काटकसरीचे उपाय योजावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनादेखील पत्र पाठवण्यात आलं आहे. यासोबत महानगरपालिकेत फक्त शहरविकास विभागातील बिल्डरांच्या फाईल्स लगेच क्लियर केल्या जातात, नागरिकांच्या मागण्या तशाच राहतात, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
ठाणे महापालिकेवर सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. जिल्ह्यात ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली मानली जात असतानाच, वाढत्या कर्जाच्या बोजामुळे तिजोरीवर आणि पर्यायाने ठाणेकरांवर बोजा पडणार आहे. गेल्या काही वर्षांत महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून विविध मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. सामान्य ठाणेकरांची गरजेएवढ्या आणि आवश्यक सुविधांची अपेक्षा असताना, महापालिका प्रशासनाकडून स्मार्ट ठाण्याच्या नावाखाली `सुटा बुटातील' प्रकल्प लादले गेले आहेत. या प्रकल्पांचा खर्च परवडण्याजोगा नसल्याचे स्पष्ट झाले आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधलं आहे.ठाणे महानगरपालिकेचे नेमके उत्पन्न किती, दरमहा खर्च किती, बॅंका व इतर वित्त संस्थांकडून घेतलेले कर्ज, कर्जासाठी महापालिकेला बंधनकारक असलेल्या अटी, कर्ज परतफेडीचा कालावधी, दरमहा कर्जापोटी जाणारा हप्ता आदींबाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी लवकरात लवकर आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जारी करावी. अन्यथा, आगामी काळात आर्थिक स्थिती खालावल्यास, महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नसल्याची भीती नारायण पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
मुंबई महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा पुन्हा धडाका, दोन दिवसांत 1028 किलो प्लास्टिक जप्त
मालमत्ता कर वसूलीसाठी मुंबई महापालिकेची शक्कल, खाजगी कंत्राटदार नेमण्याची शक्यता























