एक्स्प्लोर
भिवंडीत कौटुंबिक वादातून अल्पवयीन पुतण्याकडून काकाची हत्या
त्यात सोमवार (18 जून) रोजी झालेल्या भांडणात सुनीलचा हात मुरगळून दुखावल्याचा राग मनात ठेऊन, पुतण्या मंगळवारी रात्रीच्या सुमारास काका बाबुशाच्या घरात घुसला.

भिवंडी : भिवंडी शहरातील बजरंगनगर परिसरात अल्पवयीन पुतण्याने कौटुंबिक वादातून आपल्या सख्ख्या काकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. बाबुशा शिंदे (वय 28 वर्ष)असं मयत काकाचं नाव असून आरोपी पुतण्या हत्या करुन पसार झाला आहे. भिवंडी शहरातील साठेनगर शेजारील बजरंगनगर येथे बाबुशा आणि त्याचा भाऊ सुनील हे एकमजली घरात राहत होते. आपली मुलं मोठी होत असून बाबुशा यांच्या ताब्यातील खोलीत असलेला भाडोत्री काढून खोली आपणास द्यावी, अशी मागणी त्यांचा भाऊ सुनील करत होता. यावरुन बाबुशा आणि सुनील यांच्यात मागील आठवड्याभरापासून वाद सुरु होता. त्यात सोमवार (18 जून) रोजी झालेल्या भांडणात सुनीलचा हात मुरगळून दुखावल्याचा राग मनात ठेऊन, पुतण्या मंगळवारी रात्रीच्या सुमारास काका बाबुशाच्या घरात घुसला. वडिलांना मारहाण केल्याचा जाब विचारत त्याने भांडण केलं आणि चॉपर बाबुशाच्या छातीत खुपसला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने काका जागेवरच गतप्राण झाला. या घटनेनंतर पुतण्या तिथून पळून गेला. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक नारपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाबुशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात पाठवला.
आणखी वाचा























