(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Baba Siddiqui Murder Case : आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं असून त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Baba Siddiqui Murder Case : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे (NCP) नेते बाब सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. त्यापैकी एक आरोपी गुरनैल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली, तर दुसरा आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून आरोपी धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap) अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं असून त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीचे ओसीफिकेशन टेस्ट करा, न्यायालयाचे निर्देश
बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना काल (रविवारी) किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यापैकी एका आरोपीला न्यायालयानं 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. आरोपी धर्मराज कश्यपचे वय 17 वर्षांचं आहे. त्यामुळे त्याच्यावर अल्पवयीन आरोपी म्हणून खटला चालवावा. वयाच्या खात्रीसाठी वैद्यकीय चाचणीस आम्ही तयार आहोत, असा दावा आरोपींच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी न्यायालयानं ओसीफिकेशन चाचणी करण्याचे निर्देश दिले होते.
बाबा सिद्दीकींची हत्या करणारा अल्पवयीन नाहीच, ओसीफिकेशन टेस्टमधून सिद्ध
बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी धर्मराज कश्यप याची ओसीफिकेशन टेस्ट करण्यात आली. टेस्टचा अहवाल समोर आला असून आरोपी अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं आहे. टेस्टचा अहवाल आल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यपला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. झिशान सिद्दिकींच्या ऑफिसबाहेर घरी जाण्यासाठी निघाले असता बाबा सिद्दिकींवर गोळीबार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. करनैल सिंह हरियाणा, धर्मराज कश्यप उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षानं घटनास्थळी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.