बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सतर्कता, ATS ते CIU सह चार विभागांवर मोठी जबाबदारी, सलमान खानच्या मित्रांची माहिती गोळा करणार, कारण...
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अभिनेता सलमान खानच्या मित्रांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जाणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला रात्रीच्या वेळी गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबार करणाऱ्या आरोपींचं लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील काही आरोपींनी काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांचे संंबंध चांगले होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शुभू लोणकर याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये सलमान खानची मदत करणाऱ्यांना इशारा देण्यात आला होता. त्यामुळं मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच, दहशतवादविरोधी पथक, स्पेशल ब्रँच आणि सीआययूवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.सलमान खानचे जवळचे मित्र आणि त्याच्या जवळचे उद्योजक यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. भविष्यात बाबा सिद्दिकी यांच्याबाबत जे घडलं ते पुन्हा इतर कुणासोबत घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून सतर्कता घेतली जात आहे.
पोलीस झीशान सिद्दिकींचा जबाब नोंदवणार
मुंबई पोलिसांकडून शहरात ज्या सहजपणे शस्त्र येत आहेत, त्याचा देखील शोध घेतला जात आहे. मात्र, त्यांदर्भात काही माहिती मिळालेली नाही. मुंबई क्राइम ब्रँचकडून आमदार झीशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. सिद्दिकी कुटुंबीयांकडून बाबा सिद्दिकी यांच्या जीवाला कुणापासून धोका होता का याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
पोलिसांकडून एसआरए प्रकल्पाला विरोध केल्यानं बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी देईल इथं पर्यंत जाऊ शकतं का याचा देखील शोध घेतला जात आहे. कोणाबद्दल तक्रार आहे का किंवा कुणावर संशय आहे का याची माहिती देखील क्राइम ब्रँच झीशान सिद्दिकी यांच्याकडून घेऊ शकते.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचं हत्या प्रकरण पोलिसांचं इंटेलिजन्स फेल झाल्याच उदाहरण आहे, असं मुंबई पोलीस दलातील एका मोठ्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. बिश्नोई गँगच्या निशाण्यावर बाबा सिद्दिकी असतील, असं पोलिसांना वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या :