सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकल्याचा राग आहे का? फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्र्यांचं प्रत्युत्तर
अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. फडणवीसांनी आज जोरदार आरोप करत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. यावर अनिल देशमुख म्हणाले की,सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकल्याचा राग आहे का?
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काळंबेरं असल्याचं सांगत, मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात फोनवरुन संवाद होत असल्याचा दावा केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का, असा प्रतिसवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.
या प्रकरणावर निवेदन देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, "स्कॉर्पिओ गाडीचे मूळ मालक सॅम पीटर न्यूटन होते. त्यांनी इंटिरिअरसाठी दिली होती. पैसे दिले नाहीत म्हणून ही गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथे सापडला, त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नव्हती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समजेल. ठाणे पोलीस याचा तपास करत आहेत."
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात फोनवरुन संवाद : देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.
अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकल्याचा राग आहे का? : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना आणि प्रश्नांना उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, "सचिन वाझे यांनी अर्णव गोस्वामींना तुरुंगात टाकलं म्हणून राग आहे का? सचिन वाझे यांनी सात दिवस अन्वय नाईक प्रकरणात काम केलं. जी माहिती आहे ती द्या, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस सक्षम आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
खालच्या स्तरावर जाऊन गृहमंत्र्यांचं उत्तर गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. "इतक्या खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देणं हे गृहमंत्र्यांना न शोभणारं. कोणतीही उत्तरं नसल्यावर अशी वक्तव्ये केली जातात. एक गोष्ट लक्षात आली की आम्ही इतके पुरावे दिले की गृहमंत्री निरुत्तर झाले. त्यांनी भटकवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल अयशस्वी झाला आहे," असं देशमुख म्हणाले.
संबंधित बातम्या