अनिल देशमुख... ईडी... अन् ड्रामा; ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी, सीबीआय अधिकारीही अटकेत, आत्तापर्यंत नेमकं काय घडलं?
Anil Deshmukh Case : रविवारी सीबीआयचा एक गोपनिय अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचला. परंतु, या अहवालावर कोणतीही सही नव्हती. हा अहवाल कोणीतरी लीक केला होता.
Anil Deshmukh Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात काल रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळालं. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
रविवारी सीबीआयचा एक गोपनिय अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचला. परंतु, या अहवालावर कोणतीही सही नव्हती. हा अहवाल कोणीतरी लीक केला होता. या अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सबळ पुराव्यांअभावी क्लिन चिट देत असल्याचा आशय होता. मात्र सीबीआयकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. पण तो अहवाल नेमका कुठून लीक झाला? याची चौकशी करण्यात आली. याचप्रकरणी काल संध्याकाळी अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या टीमपैकी एक वकिल आनंद डागा यांच्या अटकेची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झाली की, नाही? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
नाट्यमयी घडामोडींमध्ये सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यांनीच पैसे घेऊन, लाच स्विकारत हा गोपनिय अहवाल थोडेपार बदल करुन लीक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.
काल नेमकं काय घडलं?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने 20 मिनिटे त्यांची चौकशी केली आणि त्यांची सुटका केली. मात्र त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल देशमुख यांनीच लीक केल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे.
गौरव चतुर्वेदी यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. आनंद डागा यांच्यावर संशय आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करुन त्यांनी हा चौकशी अहवाल लीक केला आहे. म्हणूनच त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांचीही नावंही समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांची चौकशी सीबीआयकडून होण्याची शक्यता आहे.
गौरव चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप
गौरव चतुर्वेदी यांना अचानक काहीही पूर्वसूचना देता सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. गौरव चतुर्वेदी यांचं 10 जणांनी अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. वरळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली होती.
अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने क्लीनचिट दिली आहे आणि सीबीआयने प्राथमिक तपासानंतर ही क्लीनचिट दिली असा अहवाला काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. एक पीडीएफ फाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे असं सीबीआयने स्पष्ट केलं. मात्र व्हायरल झालेल्या पीडीएफ फाईलबाबत सीबीआयने कोणताही स्पष्ट उल्लेख केला नव्हता.