(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : रेल्वे लाईनवरील गोखले ब्रिजचा भाग कोण पाडणार? BMC आणि रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय अपेक्षित
Mumbai News : रेल्वे लाईनवरील गोखले पुलाचा भाग पाडण्याची जबाबदारी कोण घेणार? याचा निर्णय आज अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वे लाईनवरील गोखले ब्रिजचा भाग पाडण्याची जबाबदारी रेल्वे आणि मुंबई महापालिका मागील आठवड्यात एकमेकांवर ढकलत असल्याचं समोर आलं होतं.
Mumbai News : 7 नोव्हेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या अंधेरीतील गोखले पूल (Gokhale Bridge) संदर्भात आज (11 नोव्हेंबर) दुपारी मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासना यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रेल्वे लाईनवरील गोखले पुलाचा भाग पाडण्याची जबाबदारी कोण घेणार? या संदर्भात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वे लाईनवरील गोखले ब्रिजचा भाग पाडण्याची जबाबदारी रेल्वे आणि मुंबई महापालिका मागील आठवड्यात एकमेकांवर ढकलत असल्याचं समोर आलं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनंतर या कामांना आता वेग आला आहे. मुंबई महापालिकेकडून ब्रिजच्या पुनर्बांधणी संदर्भात टेंडर पुढील 10 दिवसात काढले जाईल. शिवाय, मुंबई आयआयटीकडून लवकरात लवकर या गोखले ब्रिजचे नवे डिझाईन मागवण्यात आले आहे.
गोखले ब्रिजच्या रेल्वे लाईन वरील भागाचे काम पाडून पूर्ण करण्यास तीन महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. तर सप्टेंबर 2023 पर्यत गोखले ब्रिजच्या बांधणीचं काम पूर्ण करुन हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरु करण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
7 नोव्हेंबरपासून गोखले पूल वाहतुकीसाठी बंद
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल पुनर्बांधणीसाठी 7 नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आला आहे. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम (Andheri East and Andheri West) दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक होता. मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पुनर्बांधणीसाठी हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोखले पुलाची पुनर्बांधणी का?
जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय पश्चिम रेल्वेवरील वाहतूक कोलमडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले. आयआयटी-मुंबईद्वारे शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतरही गोखले रोड पूल अंशत: वाहतुकीसाठी खुला होता. पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता, कालांतराने पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
संबंधित बातमी