Mumbai Andheri Gokhale Bridge: मुंबईकरांनो आणखी काही काळ त्रास सहन करा; गोखले पूल पुन्हा सुरू होण्यास आता नोव्हेंबर महिना उजाडणार!
Mumbai Andheri Gokhale Bridge: मुंबईतील गोखले पूल हा आता जून महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Mumbai Andheri Gokhale Bridge: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला (Andheri East West) जोडणाऱ्या गोखले पूल (Gokhale Bridge) नोव्हेंबर 2022 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका (BMC) प्रयत्नशील होती. पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने कामात विलंब झाला असल्याचा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मुंबई महापालिका आणि स्थानिक आमदार अमित साटम यांनी आज पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
याआधी मे किंवा जून अखेरीस पावसाळच्या आधी हे काम पूर्ण करून गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्यात येणार होत्या. तर संपूर्णपणे गोखले पूल हा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न होता. 7 नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, परराज्यातून होणारा स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने या कामाला विलंब लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोखले पूल पुन्हा सुरू होण्यास नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील वाहतूक कोंडीचा सामना पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे.
संपाचा फटका
रेल्वेच्या भागात असलेल्या पुलाच्या डिझाईनला रेल्वेने 2 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आणि रेल्वेच्या भागामध्ये स्टील गर्डरसाठी ऑर्डर दिली. या विशेष स्टील उपकरणासाठी फक्त 2 उत्पादक आहेत. यामध्ये जिंदालचे एक प्लांट होते. तर सेलचे 7 प्लांट होते. मात्र सेलच्या रुरकी येथील प्लांटमधील संपामुळे अनिश्चित काळासाठी विलंब झाला आणि SAIL डिलीव्हरीसाठी तारीख निश्चित करू शकली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने जिंदालकडे ऑर्डर दिली आणि एप्रिलच्या अखेरीस वितरण सुरू होईल आणि 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल.
पाच महिने उशीर
जूनपर्यंत बीएमसी भागातील पुलाचे काम पूर्ण होईल आणि रेल्वे भागाच्या पुलाचे काम प्रलंबित राहणार आहे. त्यानंतर रेलवेच्या भागातील काम 15 जुलैनंतर पूर्ण करण्यासाठी 3 महिने लागतील. रेल्वेच्या भागातील काम झाल्यानंतर जोडणीचे काम आणि नंतर अंतिम फिनिशिंग केलं जाईल. त्यामुळे दिवाळी दरम्यान नोव्हेंबरच्या मध्यात असेल पुलाचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आधीच्या डेडलाईनचा विचार करता पाच महिने या कामाला आता विलंब होणार आहे.