'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
Andheri East Assembly Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्याविरोधात तयारी सुरू करण्याचे निर्देश भाजपने मुरजी पटेल यांना दिल्याची माहिती आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारी लागा असा निर्देश देण्यात आले आहेत. भाजपकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, पेढे भरवून एकमेकांचे अभिनंदन केले.
यापूर्वी भाजपचे आमदार अमित साटम यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा भाजप लढणार आणि कमळावरच लढणार असा दावा केला होता. यानंतर आता थेट मुरजी पटेल यांना वरिष्ठांकडून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश देण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. त्यानंतर मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून फटाके आणि पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.
सध्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळी ही जागा जर भाजपकडे आली तर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके असा सामना होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचा दावा, स्वीकृती शर्मांची तयारी सुरू
अंधेरी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाकडून एन्काउंटर फेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच शिंदे गटाच प्रवेशही केला आहे. आगामी विधानसभा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्रित लढवणार आहे असं आधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा आणि भाजपचे मुरजी पटेल या दोघांपैकी एकालाच तिकीट दिलं जाईल. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपापली ताकद दाखवण्यासाठी जंगी कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं आहे.
पोटनिवडणुकीत मुरजी पटेलांची माघार
अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. त्यावेळीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं होतं. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. नंतर या निवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
पोटनिवडणुकीत जरी मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची त्यांनी तयारी मात्र जोरदार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात. तसेच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे.
ही बातमी वाचा: