Mumbai Gujarati Board : गुजराती पाट्यांवर ठाकरे गटाकडून सर्जिकल स्ट्राईक; भाजप नेते म्हणतात, गुजरातीमध्ये पाटी लावू नये असा नियम आहे का?
Mumbai Ghatkopar Gujarati Sign Board : मुंबईत गुजराती पाट्यांचा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मराठीत फलक असावे हा नियम आहे. मात्र, गुजरातीमध्ये फलक असू नये असा नियम आहे का, असा सवाल भाजपने केला आहे.
मुंबई : मुंबईत गुजराती पाट्यांचा (Mumbai Gujarati Board) वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. घाटकोपरमध्ये (Ghatkopar) काही दिवसांपूर्वी गुजराती भाषेत असलेल्या 'मारू गुजराती' ही पाटी तोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज घाटकोपर पूर्व येथील आर.बी.मेहता मार्गावरील गुजराती नामफलक तोडण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) ही तोडफोड केली असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. तोडफोडीविरोधात भाजप आक्रमक झाली असून गुजराती पाटी पाटी असूच नये असा नियम आहे का, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
घाटकोपर पूर्वमधील आर बी मेहता मार्गावरील गुजराती नामफलक फोडल्याने भाजप आक्रमक झालीय. ठाकरे गटानं हा नामफलक फोडल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजप आमदार पराग शहा, माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आर. बी. मेहता मार्गाची पाटी तोडण्यात आली तिथे निदर्शने करण्यात आली. भाजपचे मु्ंबई सचिव, माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी म्हटले की, 2016 मध्ये मी नगरसेवक असताना हवेली पूल जवळ सदर चौक बांधण्यात आले आणी सदर चौकाच्या एका बाजूला मराठीत "माझे घाटकोपर" दुसऱ्या बाजूला इंग्रजीत "My Ghatkopar" आणि तिसऱ्या बाजूला गुजरातीमध्ये "मारू घाटकोपर" आणि चौकाच्या मध्यभागी मराठी मध्ये आपले स्वागत आहे असे लिहिले होते. "The world is one family"असे लिहून सदर चौक व संपूर्ण परिसर माझ्या नगरसेवक निधीतून सुशोभीत करण्याला आले.
आज ह्या गोष्टीला आठ वर्ष होत आले. आजपर्यंत एक ही तक्रार कोणीही केली नाही. अचानक सदर चौकावरील गुजरातीत लिहलले "मारू घाटकोपर" हा बोर्ड काही शिवसेनेचे कार्यकर्तांनी शनिवारी रात्री तोडले. ठाकरे गट आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून चढाओढ सुरू आहे. त्याच्या परिणामी अशा घटना घडत आहेत. गुजराती सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे गुजराती पाट्यांची तोडफोड सुरू असल्याचा आरोप छेडा यांनी केला.
आमदार पराग शहा यांनी म्हटले की, गुजराती पाट्यांच्या तोडफोडीच्या घटनेबद्दल वाईट वाटत आहे. अशा राजकारणाने काही साध्य होणार नसून या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांनी म्हटले की, मराठी ही राजभाषा आहे. मुंबईसह राज्यातील फलक, नामफलक मराठीमध्ये असावे याबाबत काहीच दुमत नाही. मात्र, गुजरातीमध्ये फलक नसू नये असा नियम आहे का असा सवाल त्यांनी केला. मानखुर्दमध्ये उर्दूमधले ठाकरे गटाला फलक कसे चालतात, ते फलक तोडण्याची हिंमत ठाकरे गटात आहे का, असा सवालही त्यांनी केला.