Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Karanja Assembly Election : यावेळेस सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात चुरशीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेली दोन पंचवार्षिक हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.
वाशिम : वाशिममधील कारंजा मतदारसंघात यंदा जोरदार चुसर असल्याचं दिसून येतंय. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर महाविकास आघाडीनेही या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून यंदा सई डहाके, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्ञायक पाटणी तर वंचितकडून सुनील धाबेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटनी 73 हजार 205 मतं घेत विजयी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांना 50 हजार 841 मते मिळाली होती.
मतदारसंघाचा इतिहास काय?
कारंजा विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक शहर असलेला मतदारसंघ. या शहराला श्रीमंत आणि मोठी बाजारपेठ म्हणून एकेकाळची ओळख. या मतदारसंघाची निर्मिती 1978 मध्ये निर्माण झाली. 1978 ते 1985 ही वर्षे सोडले तर इथं कोणत्या एका राजकीय पक्षाचा आमदार एका पंचवार्षिकपेक्षा अधिक काळ प्रतिनिधीत्व करू शकला नाही. मात्र गेली दोन पंचवार्षिक हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आणि मतदारसंघात परिस्थिती बदलली. भाजपकडून इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आयात करण्याची वेळ आली. मात्र इच्छुक असलेले दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्राला भाजपकडून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी MIM पक्षाचा पतंग हाती घेतला. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र यांनी काँग्रेसचा हात सोडून वंचितकडून उमेदवारी मिळवली आहे.
पुसदच्या नाईक घराण्याला जवळपास 13 वर्षे मुख्यमंत्रीपद देणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे ययाती नाईक यांनी समनक जनता पार्टीची साथ घेत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळतेय.
या आधी जातीय समीकरणाच्या भरवशावर या मतदारसंघात निवडणूक लढवल्या गेल्या आहेत. मात्र यावेळेस सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात चुरशीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं या मतदारसंघात कोणता चेहरा निवडून येईल आणि या मतदारसंघात याचे चित्र स्पष्ट होत नसल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी यांचे वजन मतदारसंघात भारी असून भाजपच्या उमेदवार सई डहाके आणि MIM चे उमेदवार युसूफ पुंजानी यांचे मुस्लिम कार्ड जादू करते का हे पाहावे लागेल. त्यात वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर यांनी एंट्री केल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होताना दिसते.
Karanja Assembly Election Candidate List : 2024 विधानसभेचे उमेदवार
भाजप - सई डहाके
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार - ज्ञायक पाटणी
MIM - युसूफ पुंजानी
वंचित बहुजन आघाडी - सुनील धाबेकर
समनक जनता पार्टी- ययाती नाईक