Mumbai: पोलीस भरती परीक्षेत ब्लूटूथ हेडफोन वापरुन कॉपी; उत्तर पत्रिकेतील एका चुकीमुळे कॉपी करणारे अटकेत
Mumbai: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रांवर पार पडली. मात्र यादरम्यान मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर आलं, यानंतर पोलिसांनी चौकशी करुन एका तरुणीला अटक केली आहे.
Mumbai: पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) परीक्षेदरम्यान कॉपी करण्यासाठी ब्लूटूथचा वापर केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील एका 19 वर्षीय तरुणीला मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी (Mumbai Police) नुकतीच अटक केली आहे. मनीषा साबळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तिने ब्लूटूथ, सिम कार्ड, स्पाय इअरपीस आणि ट्रान्समीटरचा वापर करून बाहेरच्या व्यक्तीकडून पेपरमधील प्रश्नांची उत्तरं मागून फसवणूक केली आहे.
पोलीस भरती परीक्षेतील कॉपी प्रकरणात वॉन्टेड असलेल्या आणखी तीन उमेदवारांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, कॉपी करुन उत्तरं लिहिल्याप्रकरणी चार विद्यार्थी पोलिसांच्या रडारखाली आले आहेत. पोलिसांना आढळलं की त्यांनी लिहिलेली उत्तरं जरी बरोबर असली, तरी ती चुकीच्या क्रमाने लिहीली होती. म्हणजेच पहिल्याचं उत्तर दुसऱ्याला, दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याला, असा घोळ घातला गेला होता.
वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर वेगवेगळ्या क्रमाने प्रश्न देण्यात आले होते, परंतु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्याला हे माहीत नव्हतं आणि तो प्रश्नपत्रिकेच्या क्रमाबद्दल अनभिज्ञ होता. त्याने सर्वांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे, दुसऱ्याचं हे, अशा पद्धतीने उत्तरं सांगितली. पोलिसांनी सांगितलं की, इच्छुकांनी सेल्युलर नेटवर्क सेवा प्रदात्याची मदत घेतली होती, उमेदवारांना कॉल आले होते आणि परीक्षेच्या काळात ते सतत त्यांच्या मोबाईल फोनवर होते.
कसा घडला कॉपीचा प्रकार?
मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करुन शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने केला आहे.
परीक्षेच्या दिवशी कॉपी करणाऱ्या काही उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडुप पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. मात्र या कॉपी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं आता समोर येत आहे.
कशी झाली हायटेक कॉपी?
7 मे रोजी मुंबई पोलीस भरतीमधील शिपाई पदाच्या 7 हजार 76 जागांसाठी मुंबईत एकूण 213 केंद्रांवर लेखी परीक्षा झाली होती. एकूण 78 हजार 522 परीक्षार्थी या परीक्षेला उपस्थित होते. तर या परीक्षेकरता एकूण 1 हजार 246 पोलीस अधिकारी आणि 5 हजार 975 अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु याच परीक्षेदरम्यान हायटेक कॉपी झाल्याचा प्रकार घडला.
उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे फोटो परीक्षा केंद्राबाहेर पाठवले. त्याची उत्तरं अवघ्या काही मिनिटांत केंद्राबाहेरील शिक्षकांच्या मदतीने काढून मायक्रो हेडफोनची मदत घेऊन, ब्लुटूथ हेडफोनची मदत घेऊन लिहिले. याविरोधात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
हेही वाचा: