Kurla Bus Accident: स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग आलं अन् घात झाला?
Mumbai Bus Accident: संजय मोरे याला फक्त मिनी बस चालवण्याचा अनुभव. मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बेस्ट अधिकारी गोत्यात?
मुंबई: मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये (Kural Bus Accident) तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती होती. काल अपघातानंतर तिघांचा तात्काळ मृत्यू झाला होता. तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचार सुरु असलेल्या दोघांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. दरम्यान, ज्या बेस्ट बसमुळे (BEST Bus Accident) हा अपघात झाला त्या बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरली असे सांगितले जात आहे. मात्र, संजय मोरे याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते का, यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जात आहे. ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव.
संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर कामाला होता. तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा. अलीकडेच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. साधारण 1 डिसेंबरपासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता. त्यापूर्वी संजय मोरे याला 10 दिवस ही बस चालवण्याचे ट्रेनिंगही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, फक्त 10 दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला पॉवर स्टेअरिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणे योग्य होते का, असा सवाल आता विचारला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संजय मोरे हा यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील लहान आकाराच्या आणि जुन्या बस चालवायचा. या बसेसमध्ये पॉवर स्टेअरिंग नव्हते. त्यामुळे या बसेसचे स्टेअरिंग बऱ्यापैकी फिरवावे लागते. मात्र, संजय मोरे याला अलीकडे जी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती, त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग होते. पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने वळवण्यासाठी फार जोर लावावा लागत नाही. स्टेअरिंग हलक्याने फिरवले तरी वाहन लगेच वळते. मात्र, जुन्या स्टेअरिंगची वाहने चालवणाऱ्या व्यक्तींना पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने चालवण्यासाठी बऱ्याचदा अवघड जाते. पॉवर स्टेअरिंगचा नेमका अंदाज न आल्यास अपघात होण्याचा धोका वाढतो. असाच काहीसा प्रकार कुर्ला येथील अपघातात घडला असावा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिनी बस चालवणाऱ्या संजय मोरेला मोठी बस चालवायला दिली
आरोपी संजय मोरेकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना. पोलिसांनी आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी होणार. बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करणार. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता. याआधी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
संजय मोरेने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट
बेस्टचालक संजय मोरे याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीत संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे. मग हा अपघात नेमका कसा घडला, या प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तसेच संजय मोरे याला अनुभव नसतानाही मोठी बस अवघ्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर कशी चालवायला दिली, याचीही अंतर्गत पातळीवर चौकशी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
कुर्ल्यात बेस्ट बस लोकांना चिरडत गेली; 7 निष्पापांचा बळी, बेस्टचालक संजय मोरेचा फोटो व्हायरल