महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे. हा विभाग अधिकाधिक जनताभिमुख व्हावा.

मुंबई : राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राला (Mumbai) 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तब्बल गेल्या 10 वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे. तत्पूर्वी आज मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला.
देशभरात दिवाळीचा उत्साह असून कामगार, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळाला आहे, तर अद्यापही काहींना दिवाळी भेटवस्तू दिल्या जात आहेत. आता, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. हसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राला 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
सामान्य प्रशासन 15 ऑक्टोबर रोजीच्या इतिवृत्तान्वये, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) यांनी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदोन्नतीच्या पदाची पात्रपात्रता तपासून निवडसूची वर्ष 2025-26 मध्ये अपर जिल्हाधिकारी (गट-अ) (वेतनश्रेणी एस २५-१ ७८,८००- २,०९,२००/-) या संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस २७-११,२३,१००-२,१५,९००/-) या संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे, असे शासन आदेशात म्हटलं आहे.
30 दिवसांत नव्या पदावर हजर राहण्याची सूचना
दरम्यान, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६३ (६) (३) मधील तरतुदनुसार पदोन्नत अधिकारी ३० दिवसांचे आत रूजू न झाल्यास सदरचे अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहतील. १५. उपरोक्त पदोन्नत अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाल्याबाबतचा अहवाल revenue@maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे/टपालाव्दारे शासनास त्वरीत कळवावे, असेही आदेशात म्हटले आहे.
महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे. हा विभाग अधिकाधिक जनताभिमुख व्हावा. पारदर्शी रहावा, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणाऱ्या मोजक्या शासकीय विभागांपैकी आपला हा विभाग महत्वाचा घटक आहे. तो अधिक बळकट व्हावा, कार्यक्षम व्हावा आणि त्यातून राज्याची प्रगती उत्तरोत्तर व्हावी, असा संकल्प आपण सारे मिळून दीपपर्वाच्यानिमित्ताने करूया, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील सहकाऱ्यांसमवेतचा फोटो शेअर केला आहे.
महसूलमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद
मंत्रालयातील दालनातून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातील नोंदणी महानिरीक्षक ते दुय्यम निबंधकपदावरील सर्व अधिकारी व भूमीअभिलेख विभागातील जमाबंदी आयुक्त ते भूमिअभिलेख उपअधीक्षक अशा सुमारे एक हजार सहाशेवर अधिकारी कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री बावनकुळे यांनी आज सकाळी संवाद साधला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व मंत्रालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा
बिहारमध्ये राजदची 'तेजस्वी' रणनीती, 36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट; तेजप्रताप यादवांचीही जागा बदलली
























