अभिषेक घोसाळकर हत्येच्या दीड महिन्यांनी पत्नी आणि वडील समोर, पहिला सवाल देवेंद्र फडणवीसांना!
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि वडील विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फेसबूक लाईव्ह चालू अतानाच ही हत्या करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ नंतर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. या घटनेचे नंतर राजकीय पडसाद उमटले होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि वडील विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आज (१९ मार्च) पत्रकार परिषद घेत, हे आरोप केले आहेत.
विनोद घोसाळकर काय म्हणाले?
जेव्हा अभिषेकची हत्या झाली, तेव्हा विरोधीपक्षांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ही मागणी राजकीय होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मुलाबाबत जे वक्तव्य केलं ते मला फार दु:ख देणारं होतं. गाडीखाली श्वान आले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर मंत्री असलेले उदय सामंत यांनीदेखील घोसाळकर यांची हत्या ही ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे, असे विधान केले होते. तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या प्रकरणावर विधान केलं होतं. मी एक कार्यकर्ता आहे. मी वर ज्यांची नावं घेतलेली आहेत, त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे. हे सर्व नेते माझ्या कुटुंबीयांना ओळखतात. गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात नसताना त्यांनी बेजबाबदरपणाचं वक्तव्य केलेलं आहे, अशा भावना विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केल्या. तसेच तपास यंत्रणेवर खूप मोठा दबाव आहे असं मला वाटतंय, असा आरोपही त्यांनी केला.
"राजकारणी लोक निवडणुकीच्या तोंडावर..."
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी आम्ही पोलिसांना cctv दिले. या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का? याचा तपास करा असे आम्ही म्हणतोय. जर यात कोणी सहभागी असेल तर चौकशीतून स्पष्ट होईल. आम्ही न्यायालयात रिट याचिका दाखल करतोय. पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले नाही. मी आता कुठल्या राजकीय व्यक्तीचे नाव घेणार नाही, असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी विनोद घोसाळकर यांनी केली. तसेच आमच्या नगरसेवक यांच्यावर दबाव टाकला जातोय. राजकारणी लोक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांवर दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.