Amit Shah: अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचं राजकीय महत्व काय? ही आहेत नेमकी गणितं...
Amit Shah in Mumbai : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचं राजकीय महत्व काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. या दौऱ्यामागची नेमकी गणितं काय आहेत ते जाणून घेऊयात...
Amit Shah in Mumbai : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी आज लालबागचा राजाचे (Lalbaug Raja Ganpati)दर्शन घेतलं. तसेच, काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या (Ganesh Darshan) दर्शनासाठीही ते उपस्थिती लावणार आहेत. तसेच शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचं राजकीय महत्व काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. या दौऱ्यामागची नेमकी गणितं काय आहेत ते जाणून घेऊयात...
भाजपचं मुंबई पालिकेवर लक्ष केंद्रीत
पुढच्या चार महिन्यात मुंबई महापालिकांचं बिगुल वाजणार आहे. शिसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यातलं ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपनं थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबई पालिकेचं वर्षाचं बजेट 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेली 25 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेना पक्ष चालवण्यासाठीची मोठी ताकद मानला जातो.
मराठी मतांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न
ठाकरेंकडून राज्याची सत्ता काढून घेतल्यानंतर, 40 आमदार फुटल्यानंतर आता पालिका गेली तर शिवसेनेची मोठी कोंडी होईल. गेल्या महापालिका निवडणुकीत आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजपनं 31 वरुन थेट 82 जागा जिंकल्या होत्या. उत्तर भारतीय मतं, गुजराती मतं आणि मनसेच्या जवळीकीमुळे मराठी मतांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीत बूथ लेव्हलपासून ते उमेदवार निवडीपर्यंत नेमकी काय रणनीती असावी यावर अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत.
उत्तर भारतीय आणि गुजराती मतांचं गणित काय?
सुमारे 40 लाख उत्तर भारतीय मतदार सध्या मुंबईत आहेत, ते मुख्यत: बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील आहेत
227 पैकी 40 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय प्रभावशाली आहेत, तिथं उत्तर भारतीयच नगरसेवक ठरवतात
त्याशिवाय 50 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचा मोठा समुदाय आहे. त्यामुळे त्यांना डावलणं अशक्य
भाजपनं प्रांत, जिल्हा आणि समुदायाच्या माहितीसह मुंबईतील मतदारांच्या अभ्यास याद्या तयार केल्याची माहिती
मुंबईत गुजराती मतांची संख्याही 15 लाखांच्या घरात आहे, त्यात गेल्या 5 वर्षात आणखी भर
जवळपास 40 वॉर्डांमध्ये गुजराती मतं निर्णायक ठरतात.. त्यांच्या पाठिंब्याशिवाय विजय अशक्य
मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मराठी कट्टा, हिंदू सणांवरचे निर्बंध हटवून नवे कार्यक्रम भाजपनं आखलेत
इतर महत्वाच्या बातम्या