Amit Shah Mumbai Tour : BMC निवडणुकीत नवीन समीकरण? अमित शाह मुंबई दौऱ्यात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता
Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या मुंबई दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Amit Shah Mumbai Tour : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. ही भेट झाल्यास भाजप आणि शिंदे गटासह मनसेदेखील एकत्र येईल. ही युती शिवसेनेला अडचणीची ठरू शकते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. वर्ष 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. त्यानंतर यंदा अमित शाह यंदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह हे आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार आहेत. शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.
अमित शाह आपल्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान 'सागर' बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी, मुंबईतील आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंसोबत हातमिळवणी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढू लागली आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर मनसेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यानंतर भाजप आणि मनसेत युतीची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती होण्याचे संकेत दिसत आहेत. मागील काही दिवसांत भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेच्या मतपेढीला धक्का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सगळे प्रयत्न करण्यात येत आहे. मनसे आणि भाजपची युती झाल्यास शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये फूट पडेल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. मतांमध्ये फूट झाल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे.
'मातोश्री'चं महत्त्व कमी होणार?
मागील काही महिन्यांपासून मातोश्रीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानावर जात भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्याशिवाय, गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवतीर्थावर हजेरी लावली. तर, दुसऱ्या बाजूला मनसेच्या नेत्यांकडून शिवतीर्थ हेच आगामी राजकारणाचे केंद्र असणार असल्याचे सूचक वक्तव्य केले जात आहे.