अंबरनाथमध्ये 1200 रुपयांचा दंड अन् पावती फक्त 200 रुपयांची! पालिकेच्या कर्मचाऱ्याचा झोल सीसीटीव्हीत कैद
प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात कारवाई करताना अंबरनाथमध्ये नागरिकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे: प्लॅस्टिक मुक्त शहराची मोहीम आता अनेक महापालिकांकडून राबवण्यात येत आहे. त्यासाठी विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. तसा जर कोणी वापर करत असेल तर त्याला आर्थिंक दंड लावण्यात येतो. पण अंबरनाथमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात कारवाई करताना 200 रुपयांची पावती देऊन 1200 रुपयांची वसुली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्याने केलेला हा झोल सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यात येत असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात धर्मराज डेअरी नावाचं दुधाचं दुकान आहे. या दुकानात गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पालिकेचे काही कर्मचारी गेले. त्यांनी या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचं सांगत दुकानदार मनीष पटेल याला 1200 रुपये दंड भरण्यास सांगितलं. यावेळी दुकानदाराकडे पैसे नसल्यानं त्यानं अक्षरशः बाजूच्या दुकानदाराकडून उधार घेऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 1200 रुपये आणून दिले.
मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अवघ्या 200 रुपयांची पावती दिली. त्यामुळं मनीष याने पावती 200 रुपयांचीच का दिली? अशी विचारणा केली असता, जास्त बोललास तर 25 हजार रुपयांचा दंड लावेन, असा दम देत हे कर्मचारी तिथून निघून गेले. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा झोल सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दुकानदार मनीष पटेल याने केली आहे.
दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती मिळाली. या घटनेमुळे प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: