AC Local Train : प्रवास गारेगार होणार, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात
AC Local Train : आता लोकल प्रवास आणखी गारेगार होणार आहे. एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे.
AC Local Train : आता लोकल प्रवास आणखी गारेगार होणार आहे. एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास 65 ऐवजी आता केवळ 30 रुपयांमध्ये करता येणार आहे. मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लाखो नागरिक रोज लोकलने प्रवास करतात. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलही सुरु केली होती. मात्र, एसी लोकलच्या महागड्या भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी आज एसी लोकल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी माहिती दिली की, 2009 ते 2014 पर्यंत मुंबईला फक्त अकराशे कोटीचा निधी देण्यात आला होता. मात्र, यंदा 11 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी अहमदनगर ते बीड रेल्वे या ७ तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही एसी लोकलच्या भाड्यात कपात केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.
प्रशासनाकडून सुधारित नवीन एसी लोकल सुरु करण्याची तयारी
रेल्वे प्रशासन लवकरच सुधारीत नवीन एसी लोकल सुरु करण्याच्या विचारात आहे. मुंबईतील नवीन एसी लोकल ट्रेन 2023 मध्ये सुधारित आसन व्यवस्था आणि वाढीव प्रवासी जागांसह उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर सुरू धावण्याची अपेक्षा आहे. या गाड्यांमध्ये मेट्रोसारखी अत्याधुनिक आसनव्यवस्था असणारे डब्बे असतील. तसेच, आधीच्या गाड्यांच्या तुलनेत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अधिक जागा असेल. ट्रेनमध्ये सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बेही असतील. एक मोटर कोच सध्याचे सहा डबे आणि सामानासाठीच्या अतिरिक्त डब्ब्यांसह एकमेकांना जोडले जातील.
2024 च्या अखेरीस पहिल्या टप्पा
मुंबई रेल विकास निगम (MRVC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'एसी लोकल ट्रेनसाठी आवश्यक डिझाइन आणि तपशील निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी निविदा जारी करण्याच्या अंतिम प्रक्रियेवर सध्या काम सुरु आहे.' मे महिन्याच्या अखेरीस निविदा निघण्याची शक्यता आहे. एसी गाड्यांचा पहिला टप्पा 2024 च्या अखेरीस धावण्याची शक्यता आहे.
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) 3A अंतर्गत 238 AC लोकल गाड्या खरेदी करेल. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत गाड्यांची खरेदी केली जाईल. सध्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कल्याण-कर्जत रेल्वे स्थानकं आणि सीएसएमटी-पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर एसी लोकल धावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...
- GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन' वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन
- Coronavirus Cases India : धोकादायक! देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, गेल्या 24 तासांत 3,377 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी