मंत्रालयात वेटरच्या 13 पदांसाठी 7000 अर्ज
चौथी पास पात्रता असलेल्या 13 जागांसाठी 7000 अर्ज येणे आणि त्यात पदवीधर उमेदवारांची संख्या अधिक असणं, यातून राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र समोर येत आहे.

मुंबई : मंत्रालयातील कॅन्टिनमधील वेटरच्या 13 पदांसाठी जवळपास 7000 अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बहुतांश अर्जदार पदवीधर होते. या पदासाठी शैक्षणिक पात्रता चौथी पास आहे. मात्र काही महिन्यापूर्वीच या पदासाठी लेखी परीक्षाही घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2018 मध्ये या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर आता या उमेदवारांची कामावर रुजू होण्याची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. निवड झालेल्या 13 उमेदवारांपैकी आठ पुरुष आणि इतर महिला आहेत. दोन-तीन उमेदवारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.
निवड झालेल्या 13 उमेदवारांपैकी 12 जण पदवीधर आहेत, तर एक बारावी पास आहे. वेटरच्या जागेसाठी अर्ज दाखल केलेले बहुतेक उमेदवार पदवीधर आणि बारावी पास होते. मात्र चौथी पास पात्रता असलेल्या जागेसाठी पदवीधर आणि बारावी पास उमेदवारांची निवड केल्याने प्रशासनावर टीका होत आहे याशिवाय उमेदवारांची वेटर पदासाठी लेखी परिक्षाही घेण्यात आली.
चौथी पास पात्रता असलेल्या 13 जागांसाठी 7000 अर्ज येणे आणि त्यात पदवीधर उमेदवारांची संख्या अधिक असणं, यातून राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र समोर येत आहे.
























