फी न भरल्याने 27 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, खारघरमधील विश्वज्योत शाळेतील प्रकार
विश्वज्योत शाळेने गेल्या दोन वर्षात 51 टक्के फी वाढ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत अनेक वेळा शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी यांना भेटण्याचा प्रयत्न करूनही त्यांना वेळ दिला जात नाही.
नवी मुंबई : फी कमी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढण्याचा प्रकार खारघर येथील विश्वज्योत शाळेने केला आहे. शाळेने वाढवलेली ज्यादा फी भरण्यास नकार दिल्याने 27 विद्यार्थ्यांना थेट शाळेतूनच काढत व्यववस्थापनाने हुकूमशाही केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान शाळेविरोधात कारवाई करण्याचे संकेत पनवेल महानगर पालिका प्रशासनाने दिले आहेत.
खारघर मध्ये असलेल्या विश्वज्योत शाळेने फी कमी भरलेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून बाहेर काढले आहे. 27 विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले काढून त्यांच्या मेलवर पाठवण्यात आले आहेत. फी न भरल्याने शाळेतून काढल्याचा शेरा लिव्हींग सर्टिफीकेटवर मारला आहे. या विरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याबरोबर शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
विश्वज्योत शाळेने गेल्या दोन वर्षात 51 टक्के फी वाढ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत अनेक वेळा शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी यांना भेटण्याचा प्रयत्न करूनही त्यांना वेळ दिला जात नाही. असलेल्या फी पैकी 70 ते 80 टक्के फी पालकांनी भरली आहे. फक्त वाढीव फी मागे ठेवली आहे. यानंतरही शाळेने विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता शाळेतून काढल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
कायद्याने आठवीपर्यंत शिक्षणाचा मुलभूत अधिकार असताना शाळेने चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना काढून टाकले आहे. ही हुकूमशाही असून या विरोधात
शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढणे योग्य नसून शाळेवर
योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पनवेल आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान याबाबत शाळेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.