Jalgaon Crime News: प्रेमविवाहाचा भयंकर अंत, रक्ताचे सुकलेले ओघळ, चारही बाजूंना स्मशानशांतता; जळगावच्या गाढे चौकात रविवारी नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: जळगावमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jalgaon Crime News: पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीच्या कुटुंबियांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची घटना काल (19 जानेवारी) जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात (Jalgaon Crime News) घडली. या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ (Mukesh Shirsat) या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे. तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याने मानले जात असून समाजमन सुन्न झाले आहे.
जळगावमधील (Jalgaon Murder Case) पिंप्राळा हुडको परिसरातील गाढे चौकात राहणाऱ्या मुकेश शिरसाठने पूजा या तरुणीसोबत पाच वर्षांआधी प्रेम विवाह केला होता. हाच मनात राग ठेऊन काल (19 जानेवारी) मुकेश शिरसाठवर पूजाच्या कुटुंबियांनी हल्ला केला. पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशच्या मानेवर वार केला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचविण्याचा करणाऱ्या मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले.
रक्ताचे सुकलेले ओघळ, चारही बाजूंना स्मशानशांतता-
सदर घटनेनंतर परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी गाढे चौकात मोठा बंदोबस्त लावला आहे. तसेच मुकेशवर वार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्त पडले होते. ते सुकलेलं रक्तही अजून चौकात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे चारही बाजूंना स्मशानशांतता असल्याचं दिसत आहे. मुकेशच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून विवाह झाल्यापासूनच ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पहात होते. काल त्यांना मुकेश एकटा सापडला. त्यामुळे मुकेशवर कोयत्याने वार करण्यात आले, असं मुकेशच्या काकाने सांगितले.
मयत मुकेशची पत्नी पूजा काय म्हणाली?
आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी माझे पती मुकेशची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येने माझ्या आणि आमच्या लहान मुलींचे भविष्य अंधकारमय झाले असून,आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूजा शिरसाठ यांनी केली आहे.