'मातोश्री'वर आंदोलनाला निघालेले राणा दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात; मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटते का? नवनीत राणांचा सवाल
राणा दाम्पत्य आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावरून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होण्याच्या आधीच पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ताब्यात घेतले.
अमरावती : आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तीन दिवसापूर्वी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आज रवी राणा त्यांच्यासोबत कारागृहात असलेल्या शेतकऱ्यांसह जामीन घेऊन कारागृहाच्या बाहेर आले होते.
त्यानंतर रवी राणा आणि खासदार नवनीत राणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार होते आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. यासाठी राणा दाम्पत्य आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावरून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होण्याच्या आधीच पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ताब्यात घेतले.
राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आणले. मात्र आम्हाला कुठल्या कायद्याच्या आधारे पोलीस आयुक्त कार्यालयात आणले आणि कुठल्या कायद्याच्या आधारे पोलीस व्हॅनमध्ये बसवले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या राणा दाम्पत्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरु असून त्यांनी आयुक्त कार्यालयाच्या आत जाण्यास नकार दिला आहे. त्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटते का? : खासदार नवनीत राणा
शेतकरांसाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला कारागृहात डांबण्यात येत आहे. सरकारचे डोके अजिबात ठिकाणावर नाही. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो असतांना आम्हाला अटक करायला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आमची भीती का वाटते? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे..
यावर्षी सुरवातीला आलेलं सोयाबिनच बोगस बियाण, परतीचा पाऊस आणि बोंडअळी, सोयाबिनवर आलेला खोडकिड, त्यांनतर आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी ही मागणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या अनेक दिवसांपासून करत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप करत शुक्रवारी अखेर आमदार रवी राणा हे गुरुकुंज मोझरीमध्ये तीव्र आंदोलन केलं. त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.