एक्स्प्लोर
ना शाईची गरज, ना ओळखपत्राची... मतदानासाठी जि.प. शिक्षकाची भन्नाट कल्पना!
मुंबई: भारतात निवडणुकांचं महत्त्व फार मोठं आहे. काळानुसार, मतदानप्रक्रियेत बदलही करण्यात आले आहेत. पण गेल्या काही वर्षात निवडणुकांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा खर्च नियंत्रणात यावा यासाठी सोलापूरमधील माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञान वापराबाबत ‘वेध भविष्याचा’ ही नवी संकल्पना मांडली असून ते आज स्वत: राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या संकल्पनेचं सादरीकरण करणार आहेत.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुकांवर होणारा खर्च कमी करता येईल. असा दावा रणजितसिंह डिसले यांनी केला आहे. तसेच बोगस मतदान होऊ नये यासाठी देखील त्यांनी एक भन्नाट कल्पना मांडली आहे. डिसले यांच्या या अहवालाबाबत सकारात्मक विचार झाल्यास निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
याआधी निवडणूक आयोगानं पारंपारिक मतदान पद्धतीला फाटा देत EVM मशीनचा वापर सुरु केला.यामुळे मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी यांचा वेग वाढला. मात्र, असं असलं तरीही मतदान कक्षातील इतर प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत नसल्याचं दिसून येत आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक अधिकारी रात्री उशीरापर्यंत वेगवेगळे अहवाल कागदी स्वरुपात तयार करताना दिसून येतात. या आणि यासारख्या बाबी लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं मत डिसले यांनी व्यक्त केलं आहे.
नेमके कोणते बदल करणं गरजेचे:
- मतदान केंद्रावर छापील मतदार याद्या देण्याऐवजी एका टॅबमध्ये डिजिटल स्वरुपात यादी साठवलेली असेल. अशी डिजिटल मतदार यादी प्रत्येक केंद्रातील अधिकाऱ्यांकडे देण्यात यावी.
- डिजिटल यादीमुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होईल.
- डिजिटल मतदार यादीत मतदाराचा आधार क्रमांक जोडता येईल. त्यामुळे मतदारांच्या बायोमेट्रिकचा समावेश करता येईल.
- मतदार यादीत आधार नंबरचा समावेश केल्यामुळे दुबार नावे, बोगस मतदान, बनावट ओळखपत्रं या प्रकारांना आळा बसेल.
- प्रत्येक निवडणुकीकरता वेगवेगळी यादी छापण्याऐवजी ती यादी डिजिटल स्वरुपात सहज अपडेट करता येईल. डेटा बँकेच्या माध्यामातून हवी ती मतदार यादी टॅबमध्ये सहजपणे अपलोड केली जाईल.
'आपला अंगठा हीच आपली ओळख'
1. डिजिटल मतदार यादी असलेला टॅब थंब स्कॅनरला जोडला जाईल. मतदार त्याचा अनुक्रमांक किंवा आधार क्रमांक सांगेल. त्यानंतर ओळख पटविण्यासाठी मतदाराचा अंगठा टॅबला जोडलेल्या थंब स्कॅनर मशीनने स्कॅन केला जाईल. आधार क्रमांकातील बायोमेट्रिकशी हे अंगठ्याचे बायोमेट्रिक जुळले की, त्या मतदाराची ओळख डिजिटल स्वरुपात साठवली जाईल.
2. ओळख पटवण्याच्या या आधुनिक पद्धतीमुळे आयोगाला ओळखपत्रे छापण्याची गरज राहणार नाही. आपला अंगठा हीच आपली ओळख असेल. मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावण्याची गरज देखील भासणार नाही. तसेच व्होटर स्लीपची गरजच राहणार नाही. यामुळे मतदान कक्ष खऱ्या अर्थानं पेपरलेस होईल.
ऑटोजनरेटेड रिपोर्ट सिस्टम:
- मतदानानंतर अधिकाऱ्यांना अनेक अहवाल तयार करावे लागतात. मात्र, नव्या यंत्रणेत सर्व अहवाल स्वयंचलित पद्धतीने तयार होत राहतील अशी सुविधा करता येईल. त्यामुळे टॅबमधील चीपमध्ये सर्व अहवाल जतन होईल. यामुळे वेळेची मोठी बचत होईल.
प्रस्तावित बदलाचे परिणाम दर्शवणारी माहिती:
- डिजिटल मतदार यादीमुळे बोगस मतदान, दुबार नावे यांसारखे गैरप्रकार पूर्णतः थांबणार.
- मतदान केल्याची निशाणी म्हणून शाई लावण्याची गरज नाही. आपला अंगठा हीच आपली ओळख.
- पेपरलेस प्रक्रियेमुळे मतदान कक्षातील निवडणूक खर्चात 40%ने घट होईल. तर मनुष्यबळाची गरज 49%ने घटणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement