पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील चॉकलेटमध्ये पुन्हा आढळल्या अळ्या, पालक संतप्त
Washim : पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामागील कारण म्हणजे परत एकदा या पोषण आहारातील चॉकलेट मध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Washim News वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्सयुक्त चॉकलेट दिले जातात. विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासन स्तरावर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत चॉकलेट वाटप केले जात असतात. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील हाच पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामागील कारण म्हणजे परत एकदा वाशिममध्ये (Washim News) पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
स्थानिकांमध्ये संतापाची लाट
वाशिम जिल्ह्याच्या आडोळी या गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चॉकलेटची कार्यक्षमता समाप्त होण्याच्या तारीखेच्या अगोदरच चॉकलेटमध्ये आळ्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हा पोषक आहार हानिकारक आणि धोका निर्माण करणारा ठरत आहे. राज्यात सातत्याने असे प्रकार उघडकीस येत असल्याने या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित कंत्राटदारावर वेळीच योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
तसेच ते या प्रकरणी लवकरच वाशिम जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटून याबाबत तक्रार करणार आहे. या योजनेअंतर्गत जे पुरवठादार जिल्ह्यातील शाळेला चॉकलेटचा पुरवठा करतात ते चॉकलेट निकृष्ट दर्जाचे असून या चॉकलेटपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चॉकलेट योजना बंद करून अशा निकृष्ट दर्जाची चॉकलेट पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी ही आता जोर धरू लागली आहे.
विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर
शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केलं जातय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे, पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI