Yavatmal News : शालेय पोषण आहार की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये आढळल्या चक्क अळ्या
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत.
Yavatmal News यवतमाळ : राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त चॉकलेट आणले आहेत. हे चॉकलेट राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. मात्र यवतमाळच्या (Yavatmal News) उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. हा प्रकार लक्षात येताच पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण विभागाच्या (Education Department) आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. त्यातील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र, त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारत ते चॉकलेट परत केले. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये आढळल्या चक्क अळ्या
राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त चॉकलेट आणले आहेत. हे चॉकलेट बाजरी, रागी, नाचणी, ज्वारी आणि मिक्स फ्रुट पासून तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यात 25 असे तीन टप्प्यात 75 चॉकलेट वितरित करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चॉकलेट अत्यंत लाभदायी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. मात्र, मार्च महिन्यात तयार केलेले हे चॉकलेट पुण्यावरून एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पोहोचल्याने शाळेतील शिक्षकांची पंचाईत झाली आहे.
विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे. असे त्यावर नमूद करण्यात आले. कंपनीने पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील असताना तो जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कसा काय पाठवण्यात आला, याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले असून लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे सांगितले आहे.
चक्क सव्वा कोटीचे चॉकलेट शाळेत दाखल
जिल्ह्यातील 2 हजार 700 शासकीय, माध्यमिक, खासगी, अनुदानित शाळांना हे चॉकलेट पोहचली आहेत. या शाळांमधील दोन लाख 56 हजार 841 विद्यार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 42 हजार चॉकलेट वितरित करण्याचे उद्धिष्ट आहे. मात्र, एकीकडे शाळांना सुट्टी लागल्यानंतर चॉकलेटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने पुरवठादाराचाही गलथानपणा पुढे आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या