Yashwantrao Chavan : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! दगाबाज चीनच्या बंदोबस्तासाठी यशवंतराव जेव्हा दिल्लीत पोहोचले
भारताला गाफील ठेऊन चीनने 1962 साली भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलावलं आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली.
नवी दिल्ली : देशावर ज्या-ज्या वेळी संकटं आली त्या-त्या वेळी मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. असंच एक मोठं संकट 1962 साली देशावर आलं. 'हिंदी-चीनी भाई-भाई' अशा घोषणा सगळीकडे दुमदुमत असताना चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला अन् भारतावर हल्ला केला. यामध्ये भारताला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावलं आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळीच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे मथळे वृत्तपत्रात छापून आले.
काय झालं होतं?
जवळपास एकाच वेळी स्वातंत्र्य झालेले भारत आणि चीन आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. शेजारील राष्ट्रांसोबत मैत्रीचे संबंध राखण्यावर, त्यांना सोबत घेऊन जाण्यावर नेहरुंचा भर होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मोओंच्या चीनपुढे मैत्रीचा हात पुढे केला. ही मैत्री इथंपर्यंत गेली की हिंदी-चीनी भाई-भाई च्या घोषणा दोन्हीकडून देण्यात आल्या.
चीनने पाठीत खंजीर खुपसला
भारतासोबत मैत्रीचे धोरण स्वीकारणाऱ्या माओंच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. त्यांनी नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसला.
भारताला गाफील ठेवत चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी आक्रमण केले. चीनने याची तयारी आधीपासूनच केली होती. भारताने मात्र तशी कोणतीही तयारी केली नव्हती. भारत-चीनचे हे युद्ध एक महिना चाललं. 21 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला.
भारताला या युद्धामध्ये नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे देशभर असंतोष पसरला. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना 1 नोव्हेंबर रोजी राजीनामा द्यावा लागला. अशा परिस्थितीत देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोण सांभाळणार? नेहरुंच्या डोळ्यासमोर त्यावेळी फक्त एकच नाव आलं... ते म्हणजे यशवंतराव चव्हाण.
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला
यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर नेहरूनी यशवंतरावांना फोन केला आणि दिल्लीला येण्यास सांगितलं. देशावर ज्या-ज्या वेळी संकट येतात त्या-त्यावेळी मराठी माणूस कोणताही विचार न करता दिल्लीच्या मदतीला जातो हा इतिहास आहे. याचीच प्रचीती यशवंतरावांनी पुन्हा एकदा दिली.
दिल्लीत गेल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाणांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळला. पुढे चार वर्षे यशवंतरावांकडे हे खातं होतं. त्यांच्याच कालावधीतच 1965 सालचं भारत-पाकिस्तान युद्ध झालं.
विश्वास सार्थ ठरवला, पाकिस्तानला धडा शिकवला
नेहरूंनी दाखवलेला विश्वास यशवंतरावांना सर्वार्थाने सार्थ ठरवला. चीनच्या धक्क्यातून सावरून त्यांनी पुढे दोनच वर्षामध्ये भारतीय लष्कराचं अत्याधुनिकरण केलं. पुढे झालेल्या 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली.
यशवंतराव चव्हाणांची आज जयंती. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मोठा हातभार लावला. महाराष्ट्रात काम करताना देशाला ज्यावेळी गरज पडली त्यावेळी त्यांनी तीही जबाबदारी यशस्वीपणे पेलली हा इतिहास आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना प्रणाम.
संबंधित बातम्या:
- Yashwantrao Chavan Birth Anniversary : 'पांडुरंगा मी तुझी चंद्रभागा अडवलीय, पण तू रागावू नकोस असं यशवंतराव का म्हणाले?'
- Yashwantrao chavan : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी...