मास्क लावायला सांगितल्याने महिलेचा पोलिसांना चावा, महिलेविरोधात गुन्हा दाखल
महिला आपल्या गावी जाण्यसाठी वैद्यकीय तपासणीसाठी मास्क न लावता बसली होती. यावेळी सुमन कांटेला यांनी गायत्रीला मास्क लावण्यास सांगितले. यावर गायत्रीने रागाच्या भरात महिला पोलीस शिपाई सुमन यांच्या हाताला जोरदार चावा घेतला.
वसई : परराज्यात जाणऱ्या श्रमिकांच्या बंदोबस्तादरम्यान एका श्रमिक महिलेने चक्क पोलिसांच्या हाताला चावा घेतला आहे. महिला पोलिसांनी मास्क लावायला सांगितल्याने संतापलेल्या महिलेने हे कृत्य केले आहे. या विरोधात माणिकपूर पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप तिला अटक केली नाही.
श्रमिकांना आपल्या मायदेशी जाण्यासाठी सात ट्रेन मंगळवारी सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे श्रमिकांमध्ये गडबड गोंधळ होऊ नये म्हणून माणिकपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दिवसभरात पोलीस आणि श्रमिक यांच्यात किरकोळ बचाबाचीच्या घटना घडल्या होत्या. श्रमिकांना समजावताना पोलीसांच्या नाकी नऊ येत होते.
वसईच्या सनसिटी मैदानात श्रमिकांसाठी टाकण्यात आलेल्या मंडपाजवळ माणिकपूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई सुमन कांटेला या बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्याच दरम्यान गायत्री रामचंद्र मिश्रा (35) ही महिला आपल्या गावी जाण्यसाठी वैद्यकीय तपासणीसाठी मास्क न लावता बसली होती. यावेळी सुमन कांटेला यांनी गायत्रीला मास्क लावण्यास सांगितले. यावर गायत्रीने रागाच्या भरात महिला पोलीस शिपाई सुमन यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. यात सुमन यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
या विरोधात माणिकपूर पोलिसांनी महिला पोलिसांच्या तक्रारी वरून गायत्री मिश्रा हिच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिला अद्याप अटक केली नसल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. तर लोक असं वागत असतील तर आम्ही काम तरी कस करायचं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.