Raju Shetti : राजू शेट्टी महाविकास आघाडीत राहणार की जाणार? मंगळवारी होणार अंतिम निर्णय
गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीवर नाराज आहेत. आता या आघाडीत रहायचं की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे.
कोल्हापूर: राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीमध्ये राहणार की बाहेर पडणार याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी राज्य कार्यकारणी बैठक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीतून आमदार व्हायचं की नाही हेही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. राजू शेट्टी या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या 5 एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं राजू शेट्टी यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं.
किमान समान कार्यक्रमावर काम नाही
महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होतं. दरम्यान, जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोडली तरी आम्ही भाजपकडे लगेच जाऊ असं होऊ शकत नाही. भाजपनं चांगलं काम केलं असतं तर त्यांच्यापासून दूर झालोच नसतो असंही राजू शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये राहिली काय किंवा नाही काय? सरकारला काही फरक पडत नाही असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला होतो. तसंच भाजपच्या काळातील सगळ्याच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या, असंही ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या: