Holi 2022 : होळीनिमित्त पत्नीकडून पतीला मिळतो काठीने मार, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील अनोखी परंपरा
Holi 2022 : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी बायका आपल्या पतीला काठीने मारतात. गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून मिरजमधील गोसावी समाजामध्ये होळी सनानिमित्त ही अनोखी परंपरा जपली आहे.
Holi 2022 : महाराष्ट्रात होळीच्या सणानिमित्त विविध भागात विविध परंपरा जपल्या जातात. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्येही अशीच एक अनोखी परंपरा आहे. मिरजमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी बायका आपल्या पतीला काठीने मारतात. गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून मिरजमध्ये राहणाऱ्या गोसावी समाजामध्ये होळी सनानिमित्त ही अनोखी परंपरा जपली आहे.
होळी पेटवलेल्या राखेत एक काठी उभा केली जाते. या काठीला पैसे आणि भगवा ध्वज लावला जातो. गोसावी समाजातील महिला या काठीचे संरक्षण करत असतात. या काठीचे पैसे पळवण्याचे आव्हान पुरुषांना देण्यात आलेले असते. हे पैसे पळवण्याचा पुरुष प्रयत्न करत असतात. परंतु, पत्नीकडून काठी आणि पैसे पळवून नेण्यास विरोध केला जातो. पुरूष काठी जवळ आले की, स्त्रिया त्यांना काठीने झोडपून काढतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ खेळला जातो. महिलांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा खेळ खेळण्यात येतो.
होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या मंदिरासमोर मिरजेतील गोसावी वस्तीत हा आगळा वेगळा खेळ खेळला जातो. होळीच्या रंगाने माखलेले स्त्री आपल्या पतीला काठीने मारत असतानाचे हे दृश्य पाहण्यासारखे असते. या खेळात महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा खेळ खेळण्यात आला नव्हता. परंतु, यंदाच्या होळी सनानिमित्त मोठ्या उत्साहात हा खेळ खेळण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोसावी समाजातील महिलांनी आपल्या पतीला काठीने झोडपून काढले.
मिरजेतील गोसावी समाजाची ही परंपरा आहे. त्यांच्या वस्तीतील दुर्गामाता मंदिरासमोर होळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ मोठ्या भक्तिभावाने खेळला जोतो. गोसावी समाजातील पुरुष आणि स्त्रिया बाहेर गावी असले तरी होळीसाठी ते मिरजेत येत असतात. या दिवशी त्यांचे नातेवाईकही हा खेळ पाहण्यासाठी येत असतात.
"आमच्या गोसावी समाजात हा खेळ खेळला जातो. वर्षभर महिलांना आम्ही रागावत असतो. परंतु, या खेळाच्या निमित्ताने आमच्या बायका आम्हाला काठीने मारतात आणि आनंद घेतात. आम्ही ही आनंद घेत त्यांचा मार खात असतो. आमची ही परंपरा आहे, असे अजय गोसावी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या