एक्स्प्लोर
Advertisement
अमरावतीतही नरभक्षक वाघाची दहशत, वाघोबा मनुष्यवस्तीत का घुसतोय?
यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीला हटवण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असतानाच आता अमरावतीमध्ये नरभक्षक वाघाने दोन जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे विदर्भात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
नागपूर : देशाचं व्याघ्र प्रवेशद्वार असलेल्या विदर्भात आता जंगलच भीतीचं कारण ठरतं आहे. एकीकडे 13 लोकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीची शोध मोहिम ही यवतमाळ येथे सुरु आहे, तर दुसरीकडे म्हणजेच अमरावतीत, एका नवीन नरभक्षक वाघामुळे थरकाप उडाला आहे. तीन दिवसात अंजनसिंगी परिसरात या वाघाने दुसरा बळी घेतला आहे.
साल 1973 मध्ये रॉयल बंगाल टायगरची घसरती संख्या बघता प्रोजेक्ट टायगरचा (व्याघ्र प्रकल्प) जन्म झाला. जंगलाच्या 'कोर' म्हणजेच हृदयात फक्त आणि फक्त वन्यजीव राहतील अशी व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे झपाट्याने वाघांची संख्या वाढली. पण मग हा 'कोअर' आता वाढलेल्या वाघांच्या संखेसाठी पुरेसा नाही. हे वाघ आजूबाजूला बाहेर म्हणजेच बफरमध्ये येऊ लागले. तिथेही संख्या बरीच वाढली आणि वाघाचा माणसाशी संघर्ष सुरु झाला. अमरावतीच्या या नवीन नरभक्षक वाघासारखे अनेक वाघ आहेत ज्यांना आपले नैसर्गिक 'कोर' जंगल माहितीच नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील वाघिणीने मारलेल्या 13 लोकांपैकी 11 गुराखी होते आणि दोन जण हे शेतात शिरून मारलेले शेतकरी. शेतात रात्री पाळत ठेवायला जाताना आणि सकाळी घरी परत येतानाची वेळ होती. दोन्ही वेळा वाघाच्याही भ्रमंतीच्या वेळा आहेत. जनावरांवर संसार चालवणाऱ्या विना सिंचनाच्या शेतकऱ्याला चाऱ्यासाठी कितीही नाही म्हटले तरी जंगल हे गाठावेच लागते. सरपण वेचायला जंगलात जाणे हे अवैध आहे, हे त्याला माहिती जरी असले, तरी गरीबीसमोर नाईलाज असतो. अशा अनेक कारणामुळे गावकरी हा स्वतःहून वाघाला आडवा जात असतो.
फक्त मनुष्यच वाघाला आडवा जातो असे नाही, तर अनेक वेळा वाघही माणसाला आडवा येतो. वाढत्या संख्येमुळे कोर आणि बफरमधून जे वाघ गावाच्या आसपास फेकल्या जातात, त्यांना लवकर समजते की हरणाच्या शिकारीपेक्षा गावातील गुरे ही सोपी शिकार आहे. तसेच पाहिजे तशी grasslands म्हणजेच गवताळ जंगलं ही निर्माण झाली नाहीत ही प्रोजेक्ट टायगरची शोकांतिका आहे. त्यामुळे वाघाचा आकडा वाढत असला, तरीही त्याच्या भक्ष्यांचा आकडा तुलनेत वाढत नाही. त्यामुळे वाघ गुरांच्या शोधात येत आहे. दुसरीकडे 'बीफ बॅन' मुळे भाकड जनावरांना आता आजूबाजूच्या जंगलात सोडून दिल्या जाते ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे वाघ त्या परिसरात सुखावतो. जर एकीकडे मनुष्य वाघाच्या घरात घुसत असला, तरी दुसरीकडे वाघही या कारणांमुळे मनुष्याला आडवा जात आहे.
मनुष्य-प्राणी संघर्षातून वाचण्यासाठी वन्यजीवप्रेमी आणि गावकरी अनेक सूचना सध्या करत आहेत. त्याचे अवलंबन झाले तर वेळ लागेल, पण नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकेल आणि मनुष्यजीवही थोडा सुरक्षित होऊ शकेल. कारण शेवटी वाघाच्या वाढत्या संख्येला जपायचे असेल तर आजूबाजूच्या मनुष्यवस्तीच्या त्याच्यासाठी सहानभूती कायम राहणं गरजेचं आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाची सोय ही ताबडतोब लावली नाही, तर एका वाघासाठी सर्व वाघांचे वास्तव्य धोक्यात येऊ शकते.
हा संघर्ष खरंच कमी करायचा असेल, तर सध्याचे 'वाघ केंद्रित' व्यवस्थापनाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. गावकऱ्यांना नुसतं जंगलात जाऊ नका हे म्हणण्यापेक्षा, त्यांचे जीवन कसे जंगलावर विसंबून राहणार नाही यासाठी पाऊले उचलावी लागतील. जंगल विकासाचा सध्याचा पॅटर्नही बदलावा लागेल. हे सर्व करायचे असेल तर एक पूर्ण नवीन दृष्टिकोनच लागणार आहे. नाहीतर हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढण्याचेच लक्षणे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement