गुजरातमध्ये शरद पवारांच्या गुप्त भेटीमागचा नेमका अर्थ काय? भेट नेमकी कुणासोबत?
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी सुद्धा भाजप-राष्ट्रवादीच्या गुप्त भेटींची चर्चा रंगली होती. आता महाविकास आघाडी एका संकटातून जात असतानच पुन्हा अशा भेटींची चर्चा सुरु आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरणावरून महाविकास आघाडी टीकेचं लक्ष्य असतानाच शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यातही ही गुप्त भेट होती मोदी-शाहांच्या गुजरातमधली. या भेटीत पवार नेमके कुणाला भेटले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी गुजरातमध्ये नेमकी कुणाची गुप्त भेट घेतली? अमित शाह की गौतम अदानी? महाराष्ट्राच्या राजकारणात अँटिलिया- वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु असताना शरद पवारांची पावलं गुजरातकडे का वळाली? या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. दैनिक भास्करच्या गुजराती आवृत्तीनं तर पवारांची ही भेट अमित शाहांसोबतच होती असा दावा केलाय.
'अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले', संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेदहापर्यंत शरद पवार अहमदाबादमध्ये होते, अशी माहिती मिळतेय. योगायोग म्हणजे याच दिवशी अमित शाहसुद्धा अहमदाबादमध्ये होते.
ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. भेटीबाबत दोन थेअरी मांडल्या जात आहेत. एक थेअरी अशी की ही भेट गौतम अदानींसोबत होती. तर दुसरी चर्चा ही भेट अमित शाहांसोबत होती. पण अशा काही भेटी झाल्याचं अधिकृतपणे अद्याप तरी कुणी मान्य करायला तयार नाहीय.
Nana Patole | शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज : नाना पटोले
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अँटिलिया, वाझे परमबीर असे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होतायत. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीचं टायमिंग महत्वाचं आहे. राज्यातला सध्याचा वाद हा गृहमंत्रालयाशी संबंधित आहे आणि अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ही गुप्त भेट झाली असं मान्य केलं तर त्यातून अजून एक महत्वाचा अर्थ निघतो. 2014 नंतर पवार-मोदींच्या अनेक वेळा भेटी झाल्या आहेत. पण जी केमिस्ट्री पवार-मोदींमध्ये आहे ती पवार-शाहांमध्ये कधीच दिसलेली नाहीय.
किंबहुना अमित शाहांच्या कार्यशैलीबद्दलची शरद पवारांची नाराजी जाहीर मुलाखतींमधून प्रकट झालेली आहे. हे सगळं लक्षात घेता जर पवार शाहांना भेटले असतील तर त्याचं महत्व अधिक वाढतं. अशी काय मजबुरी आली की शरद पवारांना अमित शाहांची भेट घ्यावी लागली, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो.
राजकारणात एखाद्या भेटीनं लगेच नवी समीकरणंच मांडली जातील असं नाही.पण एखाद्या राजकीय नात्यात आईसब्रेकर म्हणून अशा मुलाखती महत्वाच्या ठरतात. त्यामुळे लगेच एका भेटीनं राजकीय भूकंप घडेलच असं नाही. पण अशा घडामोडींत भविष्यातल्या हालचालींचा वेध असतो.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी सुद्धा भाजप-राष्ट्रवादीच्या गुप्त भेटींची चर्चा रंगली होती. आता महाविकास आघाडी एका संकटातून जात असतानच पुन्हा अशा भेटींची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्हाया गुजरात काही नवी समीकरणं दिसतात की शरद पवारांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अशा भेटींमधून ते फक्त चकवा, हूल देऊ इच्छितात हे लवकरच कळेल.