Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर कुणबी सर्टिफिकेट कुणाला मिळणार? स्थानिक समितीमध्ये कोण अधिकारी?
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढण्यात आल्यानंतर कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी स्थानिक स्तरावर तीन सदस्यीस समिती तयार केली जाणार आहे.

मुंबई : मनोज जरांगेंचे मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation Protest) एक प्रकारे यशस्वी ठरले असून त्यांच्या सहा मोठ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazette) लागू करण्याची मोठी मागणी मान्य झाली असून त्याचा जीआरही काढण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत अशा गावकी, भावकी आणि कुळातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर त्याचा फायदा हा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना मिळणार असल्याचं बोललं जातंय. कारण या आधीच 58 लाख नोंदी सापडल्या असून त्या आधारे अनेकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे. तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या ही जरांगेंची मागणी जरी सरकारने मान्य केली नसली तरी ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नात्यातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे.
हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढण्यात आल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी सरकारने गावपातळीवर त्रिसदस्यीय समितीही गठीत केली जाणार आहे. ती समिती कुणबी प्रमाणपत्रासंबंधी निर्णय घेणार आहे.
Kunbi Certificate Committe : स्थानिक पातळीवर समिती स्थापन
हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेता कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्यात येणार आहेत. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल.
Maratha Kunbi Certificate : कुणाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार?
मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा एखाद्याची शेती कसणाऱ्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा, ती कसत असल्याचा पुरावा असावा. तो नसल्यास त्यांना दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे वास्तव्य दाखवणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
कुळातील किंवा नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास आणि त्याने अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास, स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल. त्यावर सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील.
या संबंधित नेमकी कार्यपद्धती काय असेल याची माहिती शासनाच्या जीआरमध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे.
What Is Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय?
हैदराबाद गॅझेट म्हणजे 1918 साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारने जारी केलेला आदेश होय. त्याकाळी हैदराबाद संस्थानामध्ये मराठा समाज बहुसंख्य होता आणि त्यांची सत्ता व नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याची नोंद होती. म्हणून निजाम सरकारने मराठा समाजाला हिंदू मराठा या नावाने शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण (काही प्रमाणात राखीव जागा) देणारा आदेश काढला.
हैदराबाद निजामशाहीने 1918 मध्ये काढलेल्या आदेशात मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण दिले होते. आजही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात याचाच ऐतिहासिक पुरावा म्हणून हवाला दिला जातो.
Hyderabad Gazette In Marathi : हैदराबाद गॅझेटमधील मुख्य मुद्दे
1. हैदराबाद राज्यातील मराठ्यांना शासकीय नोकऱ्यांत व शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय.
2. हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला, म्हणून त्याला "हैदराबाद गॅझेट" म्हटलं जातं.
3. पुढे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅझेट वारंवार दाखवला जातो.
4. मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे, असा पुरावा म्हणून याचा वापर होतो.
ही बातमी वाचा:

























