(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? माजी मंत्री, शिवसेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक वक्तव्य
पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक वक्तव्य शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे.
रत्नागिरी : माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. 'बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे', अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते? असा सवाल देखील केला आहे. दरम्यान, एका माजी मंत्र्यानं, विद्यमान आमदारानं केलेल्या विधानाचा अर्थ काय? जबाबदार लोकप्रतिनिधीला हे विधान शोभतं का? असा सवाल सध्या जिल्ह्याच्या राजकारणात केला जात आहे. लॉकडाऊनमध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुखाला अवैध दारू विकताना पोलिसांनी पकडलं होतं. त्याचा संदर्भ घेत भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे.
काय आहे तालुका प्रमुखाचं प्रकरण?
लॉकडाऊनच्या काळात बाबु सावंत या गुहागरच्या शिवसेना उपतालुकाप्रमुखावर अवैध दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी दारू देखील जप्त करण्यात आली होती. जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. याच प्रकरणाला धरून भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस हफ्ते घेत नाहीत का? असं विधान केलं आहे. दरम्यान, 'एबीपी माझा'कडे भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण, त्यानंतर देखील अवैध धंदे पोलिसांच्या आशिर्वादामुळे चालतात का? पोलिसांवर विश्वास नाही का? शिवाय, भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांना पाठिशी घालत आहेत का? अशा प्रकारचे सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.
पाहा व्हिडीओ : पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? : शिवसेना आमदार भास्कर जाधव
इतर मुद्यांवरही भाष्य
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांनी राम कदम, सुशांत सिंग राजपूत आणि अर्णव गोस्वामी प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केल्याचं देखील यासोबतच्या इतर काही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :