भाजपच्या दबावामुळेच मंदिर उघडण्याचा सरकारचा निर्णय : प्रविण दरेकर
आम्ही राजकारणाला बळी पडणार नाही अशा घोषणाही राणा भीमदेवी थाटात सरकारने केल्या होत्या. पण आमच्या दबावामुळे सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं.
मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आंदोलने, सांप्रदायिक मंडळींनी घेतलेली ठाम भूमिका व या भूमिकेला भाजपाने दिलेले समर्थन या दबावामुळेच राज्य सरकारला मंदिरे खुले करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण यासाठी आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कुठल्याही श्रेयासाठी आम्ही हा विषय हाती घेतला नव्हता, असं स्पष्ट मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
हिंदुत्ववादी संघटना, सांप्रदायिक मंडळी यांना मंदिरे खुली करण्याच्यासंदर्भात भाजपाने पूर्ण ताकदीने समर्थन दिले. सरकारला हा निर्णय घ्यायचा नव्हता. आम्ही राजकारणाला बळी पडणार नाही अशा घोषणाही राणा भीमदेवी थाटात सरकारने केल्या होत्या. पण आमच्या दबावामुळे सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आमच्या मनासारखा निर्णय झाल्यानंतर यासाठी आनंद व्यक्त केला व आनंदोत्सव साजरा करण्यात काही गैर नाही असेही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्या भूमिका दुतोंडी
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सर्व भूमिका या दुतोंडी व दुटप्पी असतात. यापूर्वी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना पुढे यायची. पहिले मंदिर फिर सरकार... अशी घोषणाही याआधी राऊत यांनी केली होती. मग आता पहिले मंदिर कुठे गेले... असा सवाल करतानाच ते म्हणाले की, मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्रातून उठाव झाला. सांप्रदायिक मंडळी मंदिर उघडण्यासाठी पुढे आली. मंदिरावर ज्यांच्या उपजिविका अंवलंबून आहेत, त्यांनीही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाने मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच भाजप यामध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे या आंदोलनामध्ये कोणता पक्ष प्रामाणिकपणे उतरला होता, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांच्या बाबतीत या सरकारचे मत दुराग्रही
राज्य सरकारकडे संयम नाही. विधानपरिषदेच्या जागांसाठी बारा जणांच्या नावांची शिफारस सरकारने राज्यपालाकंडे केल्यानंतर त्यादृष्टीने काही प्रक्रिया आहे. त्यासाठी वाट बघावी लागते, असे सांगतानाच ते म्हणाले की, राज्यपालांच्या बाबतीत या सरकारचे मत दुराग्रही आहे. पण राज्यपाल नेहमी घटनेच्या चौकटीत राहून आपले काम करित आहे,त्यामुळे घाईने काही होणार नाही. असेही त्यांनी नमूद केले.
संबंधित बातम्या
- Temples Reopen: पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
- Temple Reopen : सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- शिर्डी साई दरबारी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन मिळणार, भाविकांना गर्दी न करण्याचं साई संस्थानचं आवाहन