Sharad Pawar on Raj and Uddhav Thackeray : राज अन् उद्धव ठाकरेंच्या 'मनसे' मलोमिलनाची रंगली चर्चा; शरद पवार अवघ्या एका वाक्यात काय म्हणाले?
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही फार मोठी अडचण नाही. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हे भाष्य केले, त्यानंतर उद्धव सुद्धा सकारात्मक आहेत.

Sharad Pawar on Raj and Uddhav Thackeray : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. राज ठाकरे यांनी सुतोवाच केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही जाहीरपणे सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल. मतभेद सोडवणे ही चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी शनिवारी याबाबतचे संकेत दिले होते. राज ठाकरे म्हणाले की, आपल्यात राजकीय मतभेद आहेत, वाद आहेत, पण महाराष्ट्रासमोर या सर्व खूप लहान गोष्टी आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही फार मोठी अडचण नाही. राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हे भाष्य केले. महेश मांजरेकर यांनी राज यांना उद्धव यांच्याशी युती करण्याबाबत प्रश्न केला होता.
राज आणि उद्धव यांच्या चर्चेवर शरद पवार काय म्हणाले?
यावर राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या ध्येयासमोर आमच्यातील भांडणे लहान आहेत. उद्धव यांचीही प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी सांगितले की माझ्याकडून कधीही भांडण झाले नाही. मात्र, माझ्याकडून विषय संपवत आहे. दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगल्यानंतर शिंदे गटाकडून खोचक टिप्पणी आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यात एका विवाह समारंभासाठी पोहोचले. यावेळी हेलिपॅडवर स्वागत करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढाचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांना (Sharad Pawar on Raj and Uddhav Thackeray) राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल विचारण्यात आले. मात्र, शरद पवार यांनी दोघांच्या घडामोडींवर बोलण्यास नकार दिला. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही धोरणांना विरोध केला असला, तरी निवडणुकीत त्यांनाच पूरक होईल, अशी भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणावरून त्यांनी शरद पवार यांनाच सर्वाधिक लक्ष्य केले होते. दुसरीकडे, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे दोन्ही बंधूंच्या मिलनाची चर्चा रंगल्याने शरद पवार व्यक्त होतील, असे म्हटले होते. तथापि, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता वेट अँड वाॅचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
मुलाखतीत राज ठाकरे काय बोलले?
1. हा वैयक्तिक स्वार्थाचा विषय नाही
राज ठाकरे म्हणाले, "एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे असे मला वाटत नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा माझ्या वैयक्तिक इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते की आपण महाराष्ट्राचे मोठे चित्र पाहिले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे."
2. उद्धव यांच्यासोबत काम करण्यास कोणताही आक्षेप नव्हता
ते म्हणाले की, "मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा मला उद्धवसोबत काम करण्यास काहीच हरकत नव्हती. प्रश्न असा आहे की, समोरची व्यक्ती मला त्यांच्यासोबत काम करायला सांगते का? मी कधीही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा अहंकार आणत नाही."
3. भाजपसोबत जाण्याबाबत ते म्हणाले, राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत नाही
महेश मांजरेकर यांनी भाजपमध्ये सामील होण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी मी जे काही बोलू किंवा करू शकतो, ते मी करेन. भाजपसोब जाणे हे राजकीय असेल, पण माझे विचार त्यांच्या विचारांशी जुळत नाहीत. तथापि, राजकारणात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. राजकारणात सर्व काही बदलते. येथे सर्व काही इतक्या वेगाने घडत आहे की कधी काय होईल हे सांगता येत नाही."
2024 च्या विधानसभा निवडणुकीत कामगिरी घसरली
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांची कामगिरी खूपच खराब होती. जिथे उद्धव यांच्या यूबीटी पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या मनसेचे खातेही उघडले गेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या






















