Weather Update : उन्हाचा झळ बसणार! पुढील तीन दिवस तापमान वाढणार
Maharashtra Weather Update : राज्यासह देशात पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Update : महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा (Temperature) पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्येही 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी कमाल तापमानाची नोंद झाली असून वर्धा येथे सर्वाधिक कमाल 43 अंश सेल्सिअस आणि बुलढाणा येथे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) आकडेवारीनुसार अकोला येथे 42.6 अंश सेल्सिअस, अमरावती 42.6, बुलढाणा 39.7, ब्रम्हपुरी 41.2, चंद्रपूर 42.4, गडचिरोली 42, गोंदिया 41.2 आणि नागपूर 42.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
कुठे ऊन तर कुठे पाऊस
देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज देशातील बहुतांश राज्यांचे तापमान 42 अंश सेल्सिअस ते 45 अंशांच्या दरम्यान नोंदवलं जाऊ शकतं. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. यासोबतच काही राज्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता असून याबाबत अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवार, 20 मे रोजी दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानीतील कमाल तापमान शुक्रवार, 19 मे रोजी 38.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेलं. राजस्थानमध्ये काही ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याचा अंदाज आहे. जयपूर, दौसा, अलवर, भरतपूर, करौली जिल्हे आणि आसपासच्या भागात जोरदार उष्ण वारे वाहू शकतात.
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात सतत कडक ऊन पडतंय. राष्ट्रीय राजधानीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्री उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीही वाढत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांत तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तसेच, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :